Nigdi : पतीच्या मोबाईलवर आलेला फोन उचलला म्हणून पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज – पतीच्या मोबाईलवर आलेला फोन पत्नीने उचलला. यावरून चिडलेल्या पतीने पत्नीला मारहाण केली. तसेच स्टीलचा ग्लास डोक्यात मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि 12) सकाळी अकराच्या सुमारास ओटास्किम निगडी येथे घडली.

सपना महादेव साठे (वय 35, रा. ओटास्किम निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महादेव साहेबराव साठे (वय 35) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सपना आणि आरोपी महादेव पती-पत्नी आहेत. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास महादेवच्या मोबाईलवर फोन आला. तो फोन सपना यांनी उचलला. आपल्या मोबाईलवर आलेला फोन पत्नीने उचलला याचा राग आल्याने महादेव याने सपना यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच स्टीलचा ग्लास सपना यांच्या डोक्यात फेकून मारला. यामध्ये सपना जखमी झाल्या. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.