Nigdi : निगडी प्राधिकरणात बेकायदेशीर वृक्षतोड!

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण परिसरात एक झाड मुळापासून तर एका झाडाच्या फांद्या तोडल्याचा प्रकार बुधवारी (दि. 18) उघडकीस आला. परिसरातील पर्यावरणप्रेमी संस्थांनी याबाबत आवाज उठवला असून महापालिका प्रशासनाने या बेकायदेशीर वृक्षतोडीची गांभीर्याने दखल घेतली आहे.

निगडी प्राधिकरण येथे आशियाना प्लाझा बिल्डिंगजवळ सुरू असलेल्या रहिवासी बांधकाम प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेले मोठे बदामाचे झाड बुधवारी तोडण्यात आले. तसेच जवळच असलेल्या ‘रेन ट्री’च्या फांद्या देखील तोडण्यात आल्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरातील पर्यावरण प्रेमींनी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार दाखल केली.

_MPC_DIR_MPU_II

गुरुवारी सकाळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तोडलेल्या झाडांचा पंचनामा केला. तोडलेल्या वृक्षांसाठी महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेतल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. तसेच संबंधितांवर कायदेशीर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिले आहे.

निगडी प्राधिकरण सिटीझन फोरम, देवराई फाउंडेशन, जलदिंडी, अंघोळीची गोळी, आंबेडकर संस्था, निसर्गराजा मित्र जीवांचे, सावरकर मंडळ निसर्ग मित्र विभाग या संस्थांनी झालेल्या बेकायदेशीर वृक्षतोड विरोधात आवाज उठवला आहे. वृक्ष तोडण्यासाठी प्रशासनाची कायदेशीर परवानगी घ्यावी, तसेच तोडल्या जाणाऱ्या वृक्षांच्या ऐवजी आणखी काही वृक्ष लावण्यात यावेत, अशी मागणी या संस्थांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.