Nigdi News: उच्चभ्रू सोसायटीत घुसून वृद्ध महिलेला मारहाण करत दागिने पळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल; महिलेची प्रकृती स्थिर

सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी चोरटे पाटील यांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसले. पाटील यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी पाटील यांना हाताने मारहाण केली.

एमपीसी न्यूज –  निगडी प्राधिकरण येथील उच्चभ्रू सोसायटीत जबरदस्तीने घुसून वृद्ध महिलेला मारहाण करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख रुपयांचा ऐवज पळवला. हा प्रकार सोमवारी (दि. 10) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

हेमलता पाटील (वय अंदाजे 70, रा. एमएसईबी कार्यालयाजवळ, निगडी प्राधिकरण) असे जखमी वृद्ध महिलेचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील एमएसईबी कार्यालयाजवळ, निगडी प्राधिकरण येथे एका उच्चभ्रू सोसायटीत राहतात. सोमवारी रात्री घरात पाटील एकट्याच होत्या. त्यांच्या घराच्या बाजूला त्यांची मुलगी आणि जावई राहतात.

सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी चोरटे पाटील यांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसले. पाटील यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी पाटील यांना हाताने मारहाण केली.

यात पाटील जखमी झाल्या. त्यानंतर चोरट्यांनी घरातून 50 हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

मंगळवारी सकाळी हेमलता पाटील यांना निगडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. निगडी पोलिसांना मंगळवारी सकाळी घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

हेमलता पाटील यांच्या फिर्यादीवरून निगडी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके बनवली आहेत. त्यानुसार गुन्ह्याचा तपास केला जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड म्हणाले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात वाढत असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहन चोरी, घरफोडी, जबरदस्तीने ऐवज हिसकावून नेणे अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे शहरात पोलिसांचा वचक कमी झाला असल्याची शहरात चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.