Nigdi : इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने तीन गावातील पाच विहिरींना पुनर्जीवन

एमपीसी न्यूज- इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने खेड तालुक्यातील तीन गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. तीन गावातील पाच विहिरींचे काम करण्यात आले आहे. यामुळे गावांना वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा विहिरीत होत आहे. गावांवरील पाणीसंकट टाळण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडची मोलाची मदत झाल्याच्या भावना गावकरी व्यक्त करीत आहेत.

खेड तालुक्यातील आंबोली गावातील दोन, येणेये खुर्द गावातील दोन आणि येणेये बुद्रुक गावातील एका अशा एकूण पाच विहिरींचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.यावेळी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी-दलाल, सचिव रेखा मित्रगोत्री, रो. अर्जुन दलाल, आंबोलीचे सरपंच कचराबाई शिंदे, माजी सरपंच संजय कोकाने, येणेये गावचे सरपंच अविनाथ झुंडरे, येणेये गावचे ग्राम पंचायत सदस्य नाना भालेराव, रामदास मोरे, प्रभाकर बामले, रवी आतकर, सुभाष भालेराव आदी यावेळी उपस्थित होते. खेड पंचायत समितीचे माजी सभापती शिंदे, रो. सुहास ढमाले यांनी या कामासाठी मोलाचे सहकार्य केले.

खेड तालुक्यातील काही भागात पर्जन्यवृष्टी कमी होते. तसेच काही गावांमध्ये पाणी साठवण क्षमता कमी आहे. पंचायतींच्या विहिरींमध्ये गाळ साचल्याने पाणी खूप कमी येत असे. यामुळे गावांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात टँकरने पाणीपुरवठा केला जात असे. विहिरींमधील गाळ काढल्यास आणि पाण्याचा विहिरीतील साठा वाढविल्यास गावक-यांना पाणी पुरवठा सुरळीत होणार होता. ही बाब लक्षात घेत इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने विहिरींचे काम केले.

इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने पाच विहिरीतील गाळ काढण्यात आला. विहिरीतील गाळ काढल्यामुळे विहिरीमध्ये पाणीसाठा वाढला. तसेच नवीन पाण्याचे झरे सुरु झाले. पाण्याची विहिरीतील पातळी वाढली. यामुळे तिन्ही गावांना वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा नियमित विहिरीत जमा होऊ लागला आहे. गावांवरील पाणीसंकट टळले असून तिन्ही गावे टँकरमुक्त झाली आहेत. या विहिरींचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.