Nigdi : येलवाडीच्या बचाव पथकाला इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडकडून बचाव साहित्याची भेट

एमपीसी न्यूज- इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने खेड तालुक्यातील येलवाडी बचाव पथकाला (रेस्क्यू टीम) बचाव साहित्य भेट म्हणून देण्यात आले. हा कार्यक्रम नुकताच निगडी येथे पार पडला.

इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी-दलाल यांच्या हस्ते बचाव पथकाला बचाव साहित्य देण्यात आले. यावेळी मुक्ती पानसे, निर्मल कौर, रेखा मित्रगोत्री, रेणू मित्र, सोनाली जयंत, रो. अर्जुन दलाल, येलवाडी ग्रामस्थ प्रदीप चव्हाण, दौलत भागीत, सुभाष डोळस आदी उपस्थित होते.

पुणे परिसर हा डोंगरद-यांचा परिसर आहे. पठाराइतकेच इथे घाटमाथे आणि डोंगरद-या आहेत. कधी कोणत्या ठिकाणी अपघात होईल याचा काही भरवसा नाही. रस्त्यांवरील क्षुल्लक चुकांमुळे होणारे अपघात, डोंगराच्या कड्यावरून जाताना तोल जाऊन होणारे अपघात अशा घटनांमध्ये अनेकवेळा वेळीच मदत न मिळाल्यामुळे काहींना आपला जीव गमवावा लागतो. अशा वेळी स्थानिक नागरिकांची बचाव पथके अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीला तात्काळ धावून येतात.

येलवाडी गावातील बचाव पथक देखील अशाच प्रकारचे काम करत आहे. हे पथक नागरिकांनाच नाही तर अडचणीत सापडलेल्या जनावरांना देखील मदत करते. त्यांचे हे मानवसेवा आणि पर्यावरण रक्षणाचे काम वाखाणण्याजोगे आहे. मात्र काही वेळेला अपुऱ्या संसाधनांमुळे त्यांना बचावकार्य करणे शक्य होत नाही. त्यामुळे माणसांसह जनावरांच्या देखील मदतीला धावून जाणा-या येलवाडी बचाव पथकाला इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड ने मदतीचा हात देत बचाव साहित्य दिले. यामुळे बचाव कार्यासाठी आणखी बळ मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.