Nigdi: सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट पाचकडून अटक

Nigdi: inveterate criminal arrested by Crime Branch Unit Five अनिकेत हा मागील काही दिवसांपूर्वी कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी कुरापती सुरू केल्या.

एमपीसी न्यूज- जामिनावर कारागृहातून सुटल्यानंतर तरुणाने पुन्हा गुन्हेगारीचे सत्र सुरू केले. मात्र, पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून त्याची पुन्हा कारागृहात रवानगी केली. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचने निगडी येथे केली आहे.

अनिकेत आनंदा जाधव (वय 24, रा. दळवीनगर, निगडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस कर्मचारी सावन राठोड यांना माहिती मिळाली की, कुख्यात गुन्हेगार अनिकेत आनंदा जाधव हा चिकन चौक, निगडी येथे येणार आहे. त्याने निगडी परिसरात गुन्हा केला आहे.

आता तो पुन्हा गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार पोलिसांनी चिकन चौकात सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच अनिकेत पळून जाऊ लागला. पोलिसांनी शिताफीने त्याचा पाठलाग करून पकडले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे अनिकेत याला गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून कसून चौकशी केली असता त्याने ओटास्किम निगडी येथे अजय शेंडगे, मोहम्मद कोरबु व तुषार झेंडे यांच्यासोबत दुचाकीवरून जाऊन आदर्श मगर, विशाल खरात, अमोल जाधव व इतरांसोबत झालेल्या जुन्या वादावरुन भांडण केले.

त्यांना मारुन पैसे लुटले आणि तिथून पळून गेले. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात आरोपी अनिकेत फरार होता. पोलिसांनी त्याला अटक केली.

अनिकेत हा मागील काही दिवसांपूर्वी कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी कुरापती सुरू केल्या. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याची पुन्हा कारागृहात रवानगी केली.

आरोपी अनिकेत जाधव याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात घरफोडी आणि चोरीचे तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला पुढील कारवाईसाठी निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, सावन राठोड, संदिप ठाकरे, गणेश मालुसरे, स्वामीनाथ जाधव, फारुक मुल्ला, नितिन बहिरट, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, श्यामसुदंर गुट्टे, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, गोपाळ ब्रम्हांदे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.