Nigdi: लोकमान्य टिळक यांचा पुर्णाकृती पुतळा प्राधिकरणात उभारणार

एमपीसी न्यूज – स्मृतिशताब्दी वर्ष असणा-या लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीला पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे अभिवादन करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने निगडी, प्राधिकरणात टिळक यांचा पुणाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अन् तो मी मिळविणारच’, अशी सिंहगर्जना करून इंग्रजी साम्राज्याला धक्का देणा-या बाळ गंगाधर तथा लोकमान्य टिळक यांचे स्मृतिशताब्दी वर्ष सद्या सुरू आहे. लोकमान्य टिळक यांचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी झाले. त्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष यंदा 1 ऑगस्ट 2020 रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृतिला अभिवादन करण्यासाठी महापालिकेतर्फे त्यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. निगडी, प्राधिकरणातील टिळक चौकामध्ये टिळकांचा अर्धपुतळा आहे.

त्याचठिकाणी त्यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मानस आहे. त्यासाठी महापालिका स्थापत्य ‘अ’ मुख्यालयातर्फे निविदा मागविण्यात आल्या. मूळ 45 लाख 52 हजार 324 रुपये किंमतीच्या या कामासाठी रॉयल्टी आणि मटेरीअल टेस्टिंग चार्जेस वगळून 45 लाख 10 हजार 347 रुपयांवर निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार मेसर्स अनुश एंटरप्राईजेस, मेसर्स ईश्वर सखाराम चौधरी, मेसर्स पी. ए. शिरोळे इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर आणि मेसर्स पी. एन. नागणे या चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या.

त्यामध्ये सर्वाधिक कमी म्हणजे 14.99 टक्के कमी दराची निविदा मेसर्स अनुश एंटरप्राईजेस या कंपनीने सादर केली. त्यांनी हे काम 38 लाख 34 हजार 246 रुपये अधिक 9 हजार 77 रुपये रॉयल्टी आणि 32 हजार 900 रुपये मटेरिअल टेस्टींग चार्जेस असे एकूण 38 लाख 76 हजार 223 रुपयांमध्ये करून देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे निगडी, प्राधिकरणात लोकमान्य टिळक यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम मेसर्स अनुश एंटरप्राईजेस यांच्याकडूनच करून घेण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.