Nigdi : लुई बँक्स, जॉर्ज ब्रुक्स यांच्या फ्युजन वादनात रसिक झाले बेभान

एमपीसी न्यूज – स्वरसागर महोत्सवाच्या दुस-या दिवशी शुक्रवारी (दि. 24) दुस-या सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वादक लुई बँक्स, जॉर्ज ब्रुक्स यांनी त्यांच्या सहका-यांच्या साथीने भारतीय आणि पाश्चात्य वादनाचे फ्युजन सादर करुन रसिकांना बेभान केले. जॅझ संगीतातील एक ख्यातनाम वादक ज्यांनी भारतात ख-या अर्थाने पाश्चिमात्य वादन प्रकार रुजवले ते म्हणजे लुई बँक्स होय. तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सॅक्सोफोन वादक म्हणून जे विख्यात आहेत असे जॉर्ज ब्रुक्स यांच्या साथीने लुई यांनी यावेळी एक वेगळाच माहौल तयार केला. फरांदे स्पेसेस हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. शरयूनगर मित्रमंडळ, प्राधिकरण यांचे या महोत्सवाला सहकार्य लाभले आहे. जवाहर कोटवानी, उमेश मोरे, संकेत तुपे, परेश लोके, मलप्पा कस्तुरे यांचे यावेळी मोलाचे संयोजन सहाय्य लाभले.

सॅक्सोफोन हे वाद्य आपण हिंदी चित्रपटात विशेषत: दु:खी गाण्यांसाठी वापरलेले पाहिले आहे. पण यावेळी सॅक्सोफोनच्या साथीने जॉर्ज आणि लुई यांनी उपस्थितांना ठेका धरायला लावला. यावेळी त्यांनी सुरुवातीला पूरियाधनाश्रीमधील नैया मोरी पार करो या रचनेवर वादन सादर केले. ईशिता चक्रवर्ती या गायिकेने गायन साथ केली. तिने सादर केलेल्या रचनेवर जॉर्ज ब्रुक्स यांनी सॅक्सोफोनवर ही रचना सादर केली. त्याला लुई बँक्स यांनी कीबोर्डवर अप्रतिम साथ केली. त्यानंतर मॉर्निंग मिस्ट मधील बिलासखानी तोडी मधील रचना सादर केली. या कार्यक्रमात जॉर्ज आणि लुई यांना गायनसाथ ईशिता चक्रवर्ती हिने तर ड्रमची जोरदार साथ जीनो बँक्स यांनी व बेस गिटारची साथ शेल्डन डिसिल्वा यांनी केली.

यावेळी भारतीय संगीत आणि पाश्चात्य संगीत यांचा अप्रतिम मेळ साधलेला एक दर्जेदार व वेगळ्या धर्तीचा कार्यक्रम ऐकल्याचा व पाहिल्याचा रसिकांना मनमुराद आनंद घेता आला. कलाकारांचा परिचय मिलींद कुलकर्णी यांनी करुन दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.