Nigdi: मधुकर पवळे शाळा इमारतीची होणार डागडुजी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे अत्यंत जुन्या आणि धोकादायक असलेल्या निगडीतील महापालिकेच्या मधुकर पवळे शाळा इमारतीची डागडुजी करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे तीस लाखांहून अधिक खर्च येणार आहे.

प्रभाग क्रमांक 13 निगडीतील सेक्टर 22 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेची मधुकर पवळे शाळा आहे. या शाळेची इमारत 30 वर्षे जुनी असून या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याबाबत केबीपी सिव्हील इंजिनिअर्स सर्व्हिसेस यांना कळविण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी स्ट्रक्चरल ऑडीट अहवाल सादर करून ही इमारत व्यापक स्वरूपात दुरूस्त केल्यानंतरच ती वापरण्यास योग्य ठरणार आहे. अन्यथा ही इमारत धोकादायक ठरू शकते, असे नमूद केले आहे. या अहवालानुसार महापालिका ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाने 22 ऑगस्ट 2019 रोजी शाळा इमारतीचा वापर तात्काळ बंद करावा, असा प्रस्ताव पाठविला.

त्यावर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या शाळा इमारतीचा वापर बंद केल्यास शाळांची पर्यायी व्यवस्था करण्याबाबत शिक्षण मंडळाकडे अभिप्राय मागितला. त्यावर शाळेच्या बाजूच्या नवीन इमारत आणि प्रार्थना हॉलमध्ये स्थलांतरीत करणे शक्य असल्याचे मंडळातर्फे कळविण्यात आले. मात्र, ही शाळा रेड झोनमध्ये असल्याने या शाळेच्या इमारतीचे नवीन बांधकाम करता येणे शक्य नाही. स्ट्रक्चरल ऑडीटर केबीपी सिव्हील इंजिनिअर्स सर्व्हिसेस यांनी डागडुजीद्वारे जुन्या इमारतीची दुरूस्ती होऊ शकते, अशी शिफारस केली आहे. या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून त्यासाठी सुमारे तीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

मात्र, प्रत्यक्ष काम सुरू असताना त्या खर्चात वाढ होऊ शकते. या कामाचा सन 2019-20 च्या अंदाजपत्रकात समावेश नसून तो करणे आवश्यक आहे. त्याला नगरसेवकांनी देखील हरकत घेतलेली नाही. त्यामुळे या शाळा इमारत दुरूस्तीच्या कामासाठी लागणारी रक्कम ‘स्थापत्य विषयक काम करणे’ या लेक्षाशिर्षांतर्गत 50 लाख इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता आणि 20 लाख इतकी तरतूद ही ‘प्रभाग क्रमांक 13 मधील धर्मवीर संभाजीराजे क्रीडासंकूल विकसित करणे’ या कामाच्या स्थापत्य विषयक कामे करणे’ या लेखाशिर्षकावरून वर्ग करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.