Nigdi: महेश काळे यांच्या बहारदार गायनाची रसिकांच्या मनावर अमीट मोहिनी, स्वरसागर महोत्सवाची सांगता

एमपीसी न्यूज- स्वरसागर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी २५ जानेवारीला (शनिवार) रसिकांचा लाडका गायक महेश काळे यांनी यावेळी आपल्या बहारदार गायनाने रसिकांच्या मनावर मोहिनीच घातली. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या सत्रात महेश यांचे गायन ऐकण्यासाठी रसिकांनी साडेसहापासूनच गर्दी केली होती. राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहर उमटवलेल्या महेश यांच्या गायनाचे गारुड रसिकांच्या मनावर आधीच आहे. त्यात हा कलाकार या महोत्सवात खास रसिकाग्रहात्सव आपले  गायन सादर करतो.

महेश यांनी यावेळी राग पूरिया कल्याण मधील ‘बहुत दिन बीते, अजहून आये मोरे शाम’ ही विलंबित बंदिश सादर केली. मन लोभले, मन मोहले, ही जितेंद्र अभिषेकी यांची अजरामर रचना नव्या स्वरुपात सादर करुन नव्या जुन्याचा संगम घडवला. जॉर्ज ब्रुक्स यांच्या सॅक्सोफोनच्या साथीने सादर झालेल्या या रचनेच्या या नवीन रुपाला रसिकांनी पसंतीची पावती दिली. त्यानंतर महेश यांनी चिरपरिचित अशी सुरावट सादर करुन रसिकांना गीत ओळखण्यास भाग पाडले आणि त्यात येथे उपस्थित शंभर टक्के रसिक पास झाले, कारण ही रचना होती अत्यंत अजरामर अशी घेई छंद मकरंद. अर्थातच त्याला रसिकांच्या टाळ्यांच्या कडकडाटाची दाद मिळालीच. मात्र खरी गंमत तर पुढेच होती. या संथ, शांत लयीच्या गाण्याची एक अत्यंत जोरकस थाटाची रचना पण मूळ नाटकातच आहे. त्याच रचनेला पाश्चात्य सुरावटीने खुलवून महेश यांनी जॉर्ज ब्रुक्स यांना सॅक्सोवादन करण्यास भाग पाडले. मूळ भारतीय गीताचे हे पाश्चात्य रुप रसिकांच्या मनावर गारुड करुन गेले. अर्थातच या रचनेला चार चांद लावले ते जॉर्ज ब्रुक्स यांच्या अप्रतिम सॅक्सोफोन वादनाने. त्यातच ड्रमची साथ करणा-या आशिष आरोसकर आणि कीबोर्डची साथ करणा-या अमित गोठिवरेकर यांच्या वादनाने एक वेगळात माहौल तयार केला. प्रभाकर मोसमकर यांचा जेंबे आणि सूर्यकांत सुर्वे यांची तालवाद्ये या सगळ्यांच्या साथीला होतीच.

देश रागातील  ऐरी आवो जी आवो मंगल गावो  ही रचना सादर करता करता भारत हमको जानसे प्यारा है या देशभक्तीने भारलेल्या गीताकडे रसिकांना वळवले.  खास प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून या देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या रचना सादर करुन रसिकांच्या मनात देशभक्तीची साद घातली. त्यानंतर कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील ज्यासाठी महेश यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यातील मनमंदिरा तेजाने हे गीत सादर करुन रसिकांना स्वरांच्या हिंदोळ्यावर अक्षरश झुलवले. या गीताच्या दरम्यान खास महेश यांच्या आग्रहावरुन उपस्थितांमधून पेटलेल्या हजारो मोबाईलच्या टॉर्चने वातावरण अक्षरश चैतन्यमय झाले. त्यानंतर आम्हा नकळे ज्ञान या गीताच्या सुरांमध्ये उपस्थितांना देखील ओढून घेतले. अगदी अरसिकाला देखील यावेळी गायला भाग पाडले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वरमंचावर आपले वादन संपवून बसलेले जॉर्ज ब्रुक्सदेखील तनमन अर्पून भारावून सहभागी झाले होते. सा, रे, ग, म काहीही न कळणा-या रसिकांना गाण्यासाठी अक्षरश: ओढून काढले. त्यांच्या कडून हे सूर गाऊन घेता घेता त्याचे परिवर्तन वंदे मातरम  या गीतामध्ये कधी झाले ते उपस्थितांना देखील कळले नाही. रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आणि स्वरांनी भारलेल्या मैफिलीची सांगता वंदे मातरमने झाली.

महेश यांना या मैफिलीसाठी सूर नवा ध्यास नवा या सांगितिक कार्यक्रमातील वादकांनी अत्यंत सुंदर आणि समर्पक साथ केली. यातील खास संगत होती ती जगतविख्यात सॅक्सोफोन वादक जॉर्ज ब्रुक्स यांची. संवादिनीची साथ राजीव तांबे यांनी केली.  प्रसाद पाध्ये यांनी तबला साथ, प्रभाकर मोसमकर यांनी ढोलकीची साथ, आशिष आरोसकर यांनी ड्रमचा साथ, सूर्यकांत सुर्वे यांनी तालवाद्यांची साथ, अमित गोठिवरेकर यांनी कीबोर्ड, मनीष कुलकर्णी यांनी गिटारची साथ आणि वरद कठापूरकर यांनी सुरेल अशी बासरीची साथ केली.

यंदा स्वरसागर महोत्सवाचे २१ वर्ष असून त्यानिमित्ताने संगीत रसिकांना अप्रतिम गायन वादनाची भेट या निमित्ताने मिळाली. या सर्व कार्यक्रमासाठी फरांदे स्पेसेस हे प्रायोजक होते. तसेच शरयूनगर मित्रमंडळ, प्राधिकरण यांचे संयोजन सहकार्य लाभले. यावेळी फरांदे स्पेसेसचे अनिल फरांदे, प्रवीण पोळ, सांस्कृतिक समन्वयक प्रवीण तुपे यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला. तसेच अस्मिता सावंत, गजानन चिंचवडे, पुरुषोत्तम डबीर, मोहन लोंढे, तानाजी ठिगळे, नितीन ढमाले यांनी बहुमोल सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.