Nigdi News : मनस्वीपणा हा अभ्यंकर सरांचा विशेष गुण – डॉ. गिरीश बापट

0

एमपीसी न्यूज – कै. भाऊ अभ्यंकर यांचं असं म्हणणं होतं की, जे स्वतःला मान्य नाही ते शिकवू नये. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या स्वागतासाठी तत्वासाठी ते उपस्थित राहिले नाहीत. मनस्वीपणा हा त्यांचा विशेष गुण होता. सर्वसामान्यात ते सहज मिसळले, अशा शब्दांत ज्ञान प्रबोधनीचे संचालक डॉ. गिरीश बापट यांनी यांनी वा. ना. अभ्यंकर यांना श्रद्धांजली वाहिली.

ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे संस्थापक आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वा. ना. तथा भाऊ अभ्यंकर (वय 79) यांचे 16 फेब्रुवारी रोजी निधन झाले. ज्ञानप्रबोधिनी निगडी येथे रविवारी (दि. 21) त्यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी डॉ. बापट बोलत होते.

श्रद्धांजली सभेसाठी केंद्रप्रमुख मनोज देवळेकर, मातृ मंदिर संस्थेचे कार्यवाह यशवंत लिमये, ज्ञानेश्वर सावंत, आदित्य शिंदे, प्राचार्य सुभाष गदादे, विद्या उदास, भाऊंची कन्या भारती कुलकर्णी, माजी महापौर मंगला कदम, संतोष भणगे आदी उपस्थित होते.

डॉ. गिरीश बापट म्हणाले, “ज्ञान प्रबोधिनीची गरज म्हणून भाऊ संस्थेचे कार्यवाह झाले. ते कुशल संघटक होते. तत्वांशी बांधिलकी हा त्यांचा विशेष गुण होता. त्यांचे मार्गदर्शन आम्हास शेवटपर्यंत लाभले.

_MPC_DIR_MPU_II

मनोज देवळेकर म्हणाले, भाऊ हे भारतीय तत्त्वज्ञानाचे गाढे उपासक होते. ते हाडाचे शिक्षक होते. प्रत्येकात ईश्वरी अंश आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी खूप लोकसंग्रह केला. शिक्षण हे पुस्तकांच्या चौकटीत नसावं हा विचार देताना शाळा हे समाज विकासाचे केंद्र असावे, हा त्यांचा आग्रह होता. भाऊंच्या कार्याचा वारसा पुढे चालवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.

यशवंत लिमये म्हणाले, भाऊ निरहंकारी होते. तसेच ते धैर्यशिल व उत्साही होते. गांधीजींचे अहिंसा हे तत्त्व व विनोबांची श्रम शिलता त्यांनी अंगीकारली होती.

ज्ञानेश्वर सावंत, अरुणा पटवर्धन, व्यंकटराव भताने, नितीन कारिया, अविनाश धर्माधिकारी, यादवेंद्र जोशी,
डॉ. विनायक देसनूरकर, किशोर कानेटकर, रवींद्र राजापूरकर, प्रांजली बोरसे, विनायक थोरात यांनी देखील आपल्या भाषणातून भाऊंना श्रद्धांजली अर्पण केली.

श्रीकृष्ण अभ्यंकर (भाऊंचे सुपुत्र) यांनी श्रद्धांजली वाहून भाऊंच्या आजारपणात ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.

श्रद्धांजली सभेचे प्रास्ताविक यशवंत लिमये यांनी केले. शिवराज पिंपुडे, मधुरा लुंकड यांनी सूत्रसंचालन केले. नचिकेत देव यांनी गायलेल्या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.