Nigdi : चिंचवड येथील एटीएम चोरीच्या गुन्ह्यातील मास्टरमाईंड गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Mastermind in ATM theft case in Chinchwad caught by Crime Branch

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचची कारवाई; याच मास्टरमाईंडने केली होती एटीएमची रेकी

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील थरमॅक्स चौकात आयसीआयसीआय बँकेचे एटीएम पाच जणांच्या टोळक्याने फोडून मशीन चोरून नेली. ही घटना 8 जून रोजी घडली होती. या टोळीच्या म्होरक्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली आहे. हा म्होरक्या निगडी परिसरातील असून त्याचे अन्य साथीदार हडपसर येथील आहेत. 

मेहरबानसिंग तारासिंग डांगी (वय 25, रा. महानगर पालिका व्यायामशाळेजवळ, राजनगर, ओटा स्किम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला व नितीन बहिरट यांना माहीती मिळाली की, निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एमटीएम चोरीच्या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी मेहरबानसिंग तारासिंग डांगी हा असून, तो देहूरोड येथील सेन्ट्रल चौकात येणार आहे.

त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा लावला. आरोपी डांगी सेन्ट्रल चौकात आल्यानंतर त्याला पोलिसांची चाहूल लागली आणि तो पळून जाऊ लागला. मात्र, पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले.

सुरुवातीला डांगी याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्यासमोर त्याची हुशारी जास्त काळ चालली नाही. त्याने त्याचे सांथिदार रामजितसिंग टाक, अजयसिंग दुधानी, पापासिंग दुधानी व श्रीकांत धोत्रे यांच्या सोबत मिळून चिंचवड येथे एटीएम चोरून नेल्याचा गुन्हा कबूल केला.

डांगी हा मुळचा हैद्राबाद येथील आहे. तो वेल्डिंगचे काम करतो. कामाच्या शोधात त्याने मागील काही वर्षांपूवी पुणे गाठले आहे. पुण्यात आल्यानंतर त्याने हडपसर येथील मुलीशी लग्न देखील केले. लग्नानंतर तो पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक झाला.

ओटास्कीम, निगडी येथे राहत असताना त्याने त्याच्या सासरवाडी (हडपसर) कडील मित्रांशी जवळीक करून एटीएम चोरण्याचा कट रचला होता. डांगी याच्या दोन साथीदारांना यापूर्वी गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली आहे.

आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले पिकअप लोणीकाळभोर जवळील अवताडेवाडी येथून चोरले होते. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपी मेहरबानसिंग डांगी, रामजितसिंग टाक, अजयसिंग दुधानी, पापासिंग दुधानी आणि श्रीकांत धोत्रे यांनी मार्च महिन्यामध्ये लोणीकंद येथे एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे.

याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मेहरबानसिंग डांगी याला पुढील तपासासाठी निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अशी केली होती रेकी –

ज्या एटीएम सेंटरमध्ये जास्त रिसीप्ट (एटीएम मध्ये व्यवहार केल्यानंतर मिळणारी कागदी पावती) पडलेल्या असतील त्या एटीएम सेंटरमध्ये जास्त पैसे असतात, असा अंदाज आरोपींनी बांधला होता. त्यानुसार, आरोपी डांगी त्याच्या परिसरातील एटीएमची पाहणी करत होता.

चिंचवड आणि निगडी परिसरातील अनेक एटीएमची पाहणी केल्यानंतर त्याने थरमॅक्स चौकातील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फायनल केले. कारण या एटीएम सेंटरमध्ये दोन मशीन असून दोन्ही मशीन चोरल्यास जास्त पैसे मिळतील असा डांगी याचा अंदाज होता.

ठरवलं एक एटीएम आणि फोडलं दुसरंच…

_MPC_DIR_MPU_II

पूर्ण रेकी केल्यानंतर थरमॅक्स चौकातील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम फोडण्याचे डांगी आणि त्याच्या साथीदारांनी फायनल केले. 8 जून रोजी रात्री डांगी त्याच्या साथीदारांना घेऊन थरमॅक्स चौकात गेला. मात्र, ठरलेल्या एटीएमच्या जवळ पोलिसांची जीप थांबली होती.

त्यामुळे त्यांनी ते एटीएम फोडण्याचे रद्द केले. त्यानंतर त्यांनी त्याच रस्त्यावर असलेले आयसीआयसीआय बँकेचे दुसरे एटीएम हेरले आणि ते फोडले.

अशी झाली होती चोरी –

थरमॅक्‍स चौक येथील नवमी हॉटेलजवळ आयसीआयसीआय बँकेचे एटीएम आहे. 9 जून रोजी पहाटे पाच चोरटे पिकअप व्हॅनमधून आले. त्यांनी एटीएमला दोरखंड बांधला आणि एटीएम बाहेर ओढून काढले. एटीएम हालल्यामुळे एटीएम सेंटरमधील धोक्‍याची सूचना देणारा सायरन वाजला.

सायरन वाजत असतानाही चोरट्यांनी ओढून बाहेर आणलेले एटीएम गाडीत टाकले आणि धूम ठोकली. सायरनचा आवाज ऐकून जवळच असणारा एक सुरक्षा रक्षक सावध झाला. त्याने दुसऱ्या सुरक्षा रक्षकाच्या मदतीने पोलीस नियंत्रण कक्षास याबाबतची माहिती दिली.

या एटीएममध्ये सात जून रोजी दहा लाखांची रोकड भरण्यात आली होती. 9 जून रोजी 5 लाख 71 हजार रुपये एवढी रक्कम शिल्लक होती.

चोरलेले एटीएम मुळामुठा नदीत सापडले

आरोपींनी एटीएम चोरी करण्यासाठी होळकरवाडी येथून एक महिंद्रा पिकअप चोरी केले. चोरी केलेला पिकअपचा वापर करून चिंचवड येथील एटीएम चोरून नेले. चोरलेले एटीएम मांजरी भागात मुळामुठा नदीकिनारी नेऊन हॅण्ड ग्रॅण्डर (कटर), हातोडी व छन्नीने तोडले.

त्यातील रोख रक्कम चोरट्यांनी आपसात वाटून घेतली. त्यानंतर एटीएम नदीमध्ये उतरून पद्धतशीरपणे मध्यभागी फेकुन दिले. चोरून आणलेले पिकअप वडकीफाटा, सासवड रोड येथे रस्त्याच्या बाजूला सोडून दिले. आरोपींकडे केलेल्या चौकशीत हा प्रकार समोर आला.

पोलिसांनी मुळामुठेच्या खोल पाण्यातून एटीएम काढले. एटीएम मशीन पाण्यातून हस्तगत करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. पोलिसांनी आरोपींकडून 7 लाख 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

गुन्हे शाखा युनिट पाचच्या कामगिरीचा आलेख उंचावला; मागील दहा दिवसात आठ गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अटक

गुन्हे शाखा युनिट पाचने मागील दहा दिवसात त्यांच्या कामगिरीचा आलेख उंचावला आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार युनिट कामगिरी करीत आहे. अत्यंत किचकट गुन्हे देखील काही दिवसांमध्ये युनिट पाचच्या पोलिसांनी उघडकीस आले आहेत.

कुठलाही पुरावा नसताना खुनासारख्या गुन्ह्यात प्रत्यक्षात सुतावरून स्वर्ग गाठला आहे. शर्टवरील टेलरच्या शिक्क्यावरून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना राज्यातील आरोपींना युनिट पाचने अटक केली आहे. मागील दहा दिवसात दरोड्याच्या गुन्ह्यातील चार, दरोडा तयारी, जबरी चोरी, आत्महत्येस प्रवृत्त करणे व एटीएम चोरी अशा आठ गंभीर गुन्हयांमधील आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला, नितिन बहिरट, मयुर वाडकर, संदिप ठाकरे, गणेश मालुसरे, सावन राठोड, दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, स्वामीनाथ जाधव, ज्ञानेश्वर गाडेकर, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, श्यामसुदंर गुट्टे, धनंजय भोसले, गोपाळ ब्रम्हांदे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.