Nigdi : शाश्‍वत आनंदाची अनुभूती घेणे हेच जीवनाचे लक्ष्य – माता अमृतानंदमयी

एमपीसी न्यूज- आपण जेव्हा जीवनात एखादे कार्यक्षेत्र निवडतो, तेव्हा त्या क्षेत्रात शक्य होईल तेवढे अधिकाधिक प्राविण्य प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण त्या क्षेत्रात चिकटून राहून जीवनात यशस्वी झाले पाहिजे. कोट्यधीश बनणे हे जीवनाचे ध्येय नसून, शाश्‍वत आनंदाची अनुभूती घेणे हेच जीवनाचे लक्ष्य आहे, असे मत माता अमृतानंदमयी यांनी निगडी येथे समारोपप्रसंगी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संत मानवतेच्या जपणुकीसाठी अविरत सेवा करणा-या माता अमृतानंदमयी देवी तथा अम्मा यांची भारतयात्रा सुरु आहे. या यात्रेचा व समारोपाचा एक भाग म्हणून आज (दि.1) निगडीतील माता अमृतानंदमयी मठात समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार अनिल शिरोळे, कोल्हापूरचे सुजीत मिनोचकोर, भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी आदी उपस्थित होते. दोन दिवसांत हजारो भाविकांनी अम्मांचे दर्शन घेतले.

समारोपाच्या प्रवचनांमध्ये अम्मा म्हणाल्या, “आज मनुष्याचे जीवन अंतर्बाह्य, दुःखाच्या आक्रोशाने भरुन गेले आहे. त्याच्यावर वासना आणि क्रोध या दोन गोष्टी राज्य करतात. पहिली गोष्ट पूर्ण झाली नाही की क्रोध उफाळून येतो. आज मानवजात एक चालती-फिरती समस्या बनली आहे. नैसर्गिक समस्यांचे नियंत्रण आपल्या हातात नसले तरी येणार्‍या समस्यांची चाहूल समजण्याचे तंत्रज्ञान तर आपल्या जवळ आहे ना? परंतु, विज्ञान अजूनपर्यंत असे एखादे यंत्र बनवू शकले नाही, जे मनुष्याच्या मनात राहणार्‍या समस्यांचा शोध घेऊ शकेल. आज आपल्या जवळ ज्ञान तर खूप आहे परंतु विवेक फारच कमी आहे. आपण ईश्वराच्या हातातील केवळ एक उपकरण आहोत. सारी शक्ती ईश्वराची आहे, या गोष्टीचा कधी विसर पडू देऊ नका”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.