Nigdi : सकारात्मक विचारांची बैठक जगणे सुंदर करते -राजेंद्र घावटे

एमपीसी न्यूज – आहार, विहार, आरोग्य तसेच छोट्या गोष्टींतून आनंद मिळवण्याची कला आणि सकारात्मक विचारांची बैठक जगणे सुंदर करते, असे मत ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. दुर्गेश्वर मित्र मंडळ, श्री समर्थ युवक प्रतिष्ठान आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ‘जगणे सुंदर आहे’ या विषयावरील व्याख्यानात राजेंद्र घावटे बोलत होते.

पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदार कार्यालयातील अधिकारी गणेश सोमवंशी, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष जोशी, डॉ. गुणवंत चिखलीकर, चंद्रशेखर जोशी, पी.बी.शिंदे, प्रदीप गांधलीकर, आनंद मुळूक यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नगरसेवक अमित गावडे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिक संघ आणि सर्व हास्ययोग परिवार यांनी संकलित केलेला रुपये ९१०००/- (रुपये एक्याण्णव हजार फक्त) मदतनिधी मुख्यमंत्री निधीस देण्यासाठी पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदार कार्यालयाकडे सुपुर्द करण्यात आला.

राजेंद्र घावटे म्हणाले की, “प्रत्येकाच्या आयुष्यात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य या अवस्था येतात. वार्धक्य हा शब्द नकारात्मक वाटत असला तरी जीवनातील अनेक कटू-गोड प्रसंगांना सामोरे गेल्यानंतरच अनुभवसंपन्न अशी ज्येष्ठ नागरिक ही अवस्था प्राप्त होते. समाजातील अनेक अनिष्ट आणि चुकीच्या गोष्टी ओळखण्याची क्षमता ज्येष्ठ नागरिकांमध्ये असल्याने त्यांनी समाजासाठी दीपस्तंभ झाले पाहिजे. आंधळ्याचा डोळा, पांगळ्याचा पाय आणि अनाथांचा नाथ बनण्याचे सामर्थ्य ज्येष्ठ नागरिक दाखवू शकतात. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, “सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत?”

आपल्या आयुष्यातील वाटेत शल्य, दु:ख यांचे काटे असतात, तसे फलश्रुतीची फुलेही असतात. त्यामुळे आपली वैयक्तिक दुःखे विसरून समाजातील दु:खे दूर करण्याचा प्रयत्न केल्यास आनंदाचे निर्भेळ क्षण वाट्याला येतात. माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो म्हणून त्याने सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीतून शिकण्याचा प्रयत्न करावा; आणि आपल्या अनुभवातून समाजशिक्षकाची भूमिका पार पाडावी. मात्र, आपलेच खरे हा दुराग्रह कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य खराब करतो म्हणून वयस्कर व्यक्तींनी आत्मचिंतन करणे गरजेचे असते.

विसंवादातून अनेक विपरीत गोष्टी घडतात म्हणून सुसंवाद कुटुंब आणि समाजासाठी महत्त्वाचा असतो. आपल्या शब्दांना मांगल्याचा स्पर्श झाला तर त्याची ओवी तयार होते म्हणून नेहमी शब्द जपून वापरावेत. श्रवणभक्ती, वाचनसंस्कृती, निसर्गमैत्री, आशावाद यांतून मिळणारा आनंद आपले जगणे सुंदर करतो!”

संत ज्ञानेश्वर-तुकाराम यांची वचने, कवी कुसुमाग्रज-विंदा – ना.धों.महानोर- बाबा आमटे यांच्या कविता, मिर्झा गालिब- सुरेश भट यांची शेरोशायरी उद्धृत करीत घावटे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ‘आज, आत्ता जगून बघ!’ या स्वरचित कवितेने त्यांनी व्याख्यानाचा समारोप केला. बाळकृष्ण हिंगे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.