Nigdi : इंडिया ट्रेकच्या वतीने 18 मे रोजी मुनलाईट मॅरेथॉन स्पर्धा

एमपीसी न्यूज- इंडिया ट्रेक या संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय ‘मुनलाईट मॅरेथॉन’ स्पर्धा 18 मे रोजी आयोजित केली आहे. ही स्पर्धा निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प परिसरात होणार आहे. त्यामुळे स्पर्धकांना रात्रीच्या चंद्रप्रकाशात धावण्याचा आनंद लुटता येणार आहे.

इंडिया ट्रेक संस्था गेली 3 वर्षांपासून निसर्ग संवर्धनाचे कार्य करत आहे. निसर्ग भटकंतीद्वारे निसर्गाचे संवर्धन करणे हे संस्थेचे मुख्य उद्देश आहे. गेल्या 3 वर्षांत संस्थेने हजारो युवकांना गटकोट भ्रमंतीसाठी मार्गदर्शन केले आहे. शहरी नागरिकांचे आयुर्मान वाढवण्यासाठी पोषक आहार व नियमित व्यायामाची नितांत गरज आहे. शहरी नागरिकांमध्ये शरीर सुदृढ ठेवण्याची संस्कृती रूजावी या उद्देशाने इंडिया ट्रेकने ‘मुनलाईट मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन केले आहे.

ही मॅरेथॉन 18 मे रोजी पौणिमेच्या दिवशी आयोजित केली आहे. स्पर्धेत 3, 5 व 10 किलोमीटर अंतरासाठी महिला व पुरूष गटांसाठी शर्यत होणार आहे. स्पर्धेतील 3 किलोमीटर अंतराची शर्यत ही ‘फॅमिली रन’ असणार आहे. 5 किलोमीटर अंतराच्या शर्यतीला ‘फिटनेस’ असे नाव दिले आहे. तर, 10 किलोमीटर अंतराच्या शर्यतीला ‘चॅलेंज’ असे नाव दिले आहे.स्पर्धेचा मार्ग भक्ती-शक्ती समूह शिल्प उद्यान, आकुर्डी रेल्वे स्थानक, मोरया पेट्रोल पंप, प्राधिकरणातील जलतरण तलाव, भेळ चौक पुन्हा भक्ती-शक्ती उद्यान असा आहे.

स्पर्धेत 18 वर्षांवरील धावपटू सहभागी होऊ शकतात. स्पर्धकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक 2 किलोमीटर अंतरावर हायड्रेशन पॉईट ठेवण्यात येणार आहेत. त्या पॉईटवर स्पर्धकांना एनर्जी ड्रिक्स देण्यासाठी स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात येणार आहे. स्पर्धकांना तत्काळ वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी 2 रूग्णवाहिका उपलब्ध असणार आहेत. विजेत्यांना पदक व प्रशस्तीपत्रक बक्षीस आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी सर्वेश धुमाळ (7744866811) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.