Nigdi : मुक्तिसोपान संगीत विद्यालयाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमातील भक्तीरसामध्ये श्रोते चिंब

एमपीसी न्यूज- ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र संचालित मुक्तिसोपान संगीत विद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दिवाळी पहाट संगीत सभा धनत्रयोदशीच्या दिवशी (दि. 25) मातृमंदिरात झाली. शास्त्रीय, उपशास्त्रीय व भजन गायनाने उपसत रसिक मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाची सुरुवात स्नेहल कोकीळ यांनी गायलेल्या हंसध्वनी रागातील सरस्वती वंदनेने झाली. स्वरेशा पोरे-कुलकर्णी व नादमयी पोरे या गायिका भगिनींनी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर केले. सुरुवातीला त्यांनी भैरव अंगाचा भक्तीरसपूर्ण राग अहिरभैरव (बडा ख्याल व बंदिश) सादर केला. या ख्यालाचे बोल सो ही मन गाये ही त्यांचे गुरू पं. प्राणेशजी पोरे यांची रचना होती. सरगम , आलाप , ताना यांची जुगलबंदी या रागात सादर केली. त्यानंतर विविध रागांची नावे असलेल्या काव्यपंक्ती त्या त्या रागात गायचा कौशल्यपूर्ण गायनप्रकार अर्थात रागमाला वेगळ्या ढंगाने सादर करत नादमयीने श्रोत्यांची वाहवा मिळवली.

नंतर तुकोबारायांनी रचलेले पद्मनाभा नारायणा , मीरेच्या मनातील उत्कट कृष्णप्रीती दाखवणारे भावगीत मृदुल करांनी छेडीत तारा , शांता शेळके यांचे भावगीत गगना गंध आला , जाऊ तोरे चरणकमलपर वारी ही गीते स्वरेशा यांनी सादर करत श्रोत्यांची मने जिंकली. रामदास स्वामीरचित अभंग ताने स्वर रंगवावा , भूलोकीच्या गंधर्वा तू , संगीत स्वयंवर मधील नरवर कृष्णासमान , कंठातच रुतल्या ताना , पांडुरंग कांती , सीतेचे भावविश्व उलगडणारे नाट्यपद मी पुन्हा वनांतरी ही गीते सादर करताना नादमयीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

संगीताला वाहिलेला ग्रंथ सामवेद. प. प्राणेशजी पोरे यांनी रचलेलं संगीताच्या सप्तसुरांनी दिवाळीच्या शुभकामना देणारं पद जे या गायिका भगिनींनी स्वतः संगीतबद्ध केलं होतं ते गीत तर श्रोत्यांच्या मनाला खूपच भावले. स्वरेशा यांनी गायलेल्या जोहार मायबाप जोहार या चोखोबांच्या अभंगातून तर प्रत्यक्ष चंद्रभागा तीरी वाळवंटात कीर्तन सुरू असल्याचा भास झाला. सरतेशेवटी भैरवीने या संगीत सभेवर कळस चढवला.

विष्णुपंत कुलकर्णी व राजेंद्र पुराणिक यांनी तबला साथ तर ख्यालासाठी कीर्ती भालेराव यांनी संवादिनी साथ केली. मुक्तिसोपान संगीत विद्यालयाच्या प्रमुख शीतल कापशीकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रतीक्षा पुरंदरे, अनघा कुलकर्णी, सुनीता बावळे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट , कार्यवाह सुभाषराव देशपांडे , निगडी केंद्राचे प्रमुख वामनराव अभ्यंकर , उपप्रमुख मनोजराव देवळेकर , मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष यशवंतराव लिमये , कोषाध्यक्ष शिवराज पिंपुडे , कार्यवाह आदित्य शिंदे उपस्थित होते. निगडी केंद्रातील सदस्य , पिंपरी चिंचवड परिसरातील संगीतज्ञ व नागरिक यांनी यांनी देखील या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.