Nigdi News : आयटीआयच्या कंत्राटी निदेशकांना नियमित सेवेत सामावून घ्या; अन्यथा सामूहिक आत्मदहन

एमपीसीन्यूज : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अखत्यारीत विविध नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 309 कंत्राटी निदेशक, गट निदेशक कर्मचारी मागील अकरा वर्षांपासून 14 हजार 800 एवढ्या तुटपुंज्या वेतनावर कार्यरत आहेत. मागील अकरा वर्षात कोणतीही वेतनवाढ न घेता सुद्धा हे कर्मचारी इमानेइतबारे सेवा बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या नेमणूका सरळसेवेतील सर्व अटी व शर्थी पुर्ण करून झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ कायम सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आयटीआय कंत्राटी निदेशक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना समितीचे सहसचिव संतोष गुरव म्हणाले,  कंत्राटी निदेशक कर्मचाऱ्यांना मागील 11 वर्षांपासुन शासन सेवेत कोणतेही लाभ मिळत नाहीत. केवळ नियमित सेवेत सामावले जावू या आशेवर 314 कर्मचारी महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील वाढत्या महागाईच्या काळात तुटपुंज्या ठोक वेतनावर सेवा बजावत आहेत. मागील 11 वर्षांत एका रुपयाची सुद्धा वेतनवाढ झालेली नाही.

संबंधित कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून संवौधानिक मार्गाने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहेत. परंतु, आजअखेर आश्वासनाशिवाय काहीही ठोस कार्यवाही झालेली नाही. आता या कर्मचाऱ्यांच्या संयमाचा शासनाने अंत पाहु नये. अन्यथा एक जुलै नंतर सामूहिक आत्मदहनाचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा समितीने राज्य शासनाला दिला आहे.

आयटीआय कंत्राटी निदेशक संघर्ष समितीच्या प्रमुख मागण्या

# कंत्राटी निदेशक, गट निदेशक सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ नियमित सेवेत सामावून घ्या.

# सेवेत सामावून घेईपर्यंत या कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाइतके वेतन मार्च 2021 पासून पूर्वलक्षी प्रभावाने तातडीने मंजूर करावे.

# या कर्मचाऱ्यांना DCPCS सह सर्व सुविधा तातडीने प्राप्त व्हाव्यात.

# मागील 11 वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांची त्यांच्या मागणीनुसार प्राधान्याने इच्छित स्थळी बदली करावी.

# नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे रजा व वैद्यकीय सुविधा तातडीने लागु करण्यात याव्यात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.