Nigdi News : कृष्णानगर- त्रिवेणीनगर रस्त्यावरील सिमेंट पाईप ठरताहेत वाहतुकीला अडथळा

एमपीसीन्यूज : मार्च महिन्यातील लॉकडाऊन काळात कृष्णानगर कॉर्नर आणि त्रिवेणीनगर येथील रहदारीच्या आणि वर्दळीच्या रस्त्यावर आडवे केलेले सिमेंट पाईप अद्यापही हटविण्यात न आल्याने ते वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. शिवाय वाहने पुढे नेताना वादावादीचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळा ठरणारे पाईप त्वरित हटविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना भोसरी विधानसभा संघटक रावसाहेब थोरात यांनी केली आहे.

या संदर्भात थोरात यांनी पिंपरी चिंचवड महापालिका सारथी संकेतस्थळावर तक्रार दाखल केली आहे. गेल्या चार महिन्यांपासून भला मोठा पाईप भर रस्त्यात आडवा करुन लावण्यात आला आहे.

लॉकडाऊन काळात वाहतूक रोखण्यासाठी रस्त्यावर पाईप लावण्यात आला होता. लॉकडाऊन कालावधी समाप्त झाल्यानंतर हा पाईप रस्त्यावरून बाजूला करणे अपेक्षित होते. तथापि, याकडे अद्यापही प्रशानाचे लक्ष गेलेले नाही.

परिणामी अतिशय रुंद असलेल्या या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. शिवाय या जीर्ण झालेल्या पाइपमधून बाहेर डोकावणाऱ्या सळ्यांमुळे अपघाताचा धोका आहे.

या सळ्यांमुळे दुचाकीस्वारांचे शर्ट फ़ाटल्याचे प्रकार घडले आहेत. त्याचबरोबर रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना विनाकारण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यानंतर स्कूल बसेमुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होऊ शकते, याकडे थोरात यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.