Nigdi News: कोरोना मृतदेहांना अंत्यविधीसाठी करावी लागतेय प्रतीक्षा !

निगडी स्मशानभूमीबाहेर मृतदेह असलेल्या रुग्णवाहिकांच्या रांगा ; 15 दिवसात 300 पेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज : ( गणेश यादव) पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. आज 61 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दररोज मृतांचा आकडा वाढत आहे. गेल्या 15 दिवसांपासून निगडी स्मशानभूमीतील विद्युतदाहिन्या न थांबता सतत कार्यरत आहेत. शहराबाहेरील व्यक्तीच्या मृतदेहांचा अतिरिक्त ताणही शहरातील प्रमुख विद्युत दाहिणींवर पडत आहे. त्यामुळे अतिरिक्त ताणामुळे विद्युतदाहिनी मध्येच बंद पडण्याचा प्रकार सध्या घडत आहे. त्यामुळे मृतदेहाला सुद्धा अंत्यविधीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

या कठीण काळात परगावाहून अंतविधीसाठी आलेल्या लोकांना स्मशानभूमीत प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे कार्यकर्ते मदत करत आहेत.

गेल्या 15 दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना महामारीचे अक्षरशः तांडव सुरू आहे. दररोज हजारो रुग्ण शहरात उपचारासाठी धावाधाव करीत आहेत. रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नाहीत. रुग्णालयाबाहेर मिळेल त्या ठिकाणी रुग्ण तात्पुरता इलाज होईल या आशेने पडून आहेत. रुग्णालयात डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

अशा कठीण काळात महापालिकेच्या कुचकामी आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेचे ‘सत्य’ आता सामोरे आले आहे. श्रीमंत महापालिकेची ही दुर्दैवी अवस्था “याची देही याची डोळा” लाखो करदाते हतबल होऊन पाहत आहेत.

ऑक्सिजनची कमतरता, व्हेंटिलेटर व रेमडेसिव्हीर औषधांचा तुटवडा, यामुळे रुग्णांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. अनेक रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत आहेत.त्यातील अनेक जण मृत्यूचे मार्गक्रमण करीत आहेत. दररोज मृतांचा आकडा आता वाढत आहे.

वाढत्या कोरोना मृतांमुळे शहरातील प्रमुख स्मशानभूमींवर मोठा ताण वाढलेला आहे. शहराच्या आसपास असणाऱ्या ग्रामीण भागातील कोरोना लागण झालेले रुग्ण चांगल्या उपचारासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल होतात. त्यातील अनेक रुग्णांची स्थिती ही अत्यवस्थ असते.

_MPC_DIR_MPU_II

काही जण ती लढाई हरतात व दगावतात, त्यांचाही अंत्यविधी नियमाप्रमाणे विद्युतदाहीनीमध्ये करावा लागतो. अशा शहराबाहेरील व्यक्तीच्या मृतदेहांचा अतिरिक्त ताणही शहरातील प्रमुख विद्युत दाहिणींवर पडत आहे.

निगडी,भोसरी आणि पिंपरी या तीन ठिकाणी प्रमुख दाहिण्या सध्या शहरात कार्यरत आहेत. त्यात निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत दोन विद्युत दाहिण्या कार्यरत आहेत. 18 वर्षांपासून विद्यूतदाहिनीची सोय प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली आहे.

गेल्या 15 दिवसांपासून निगडी स्मशान भूमीतील विद्युत दाहिण्या न थांबता सतत कार्यरत आहेत. त्यामुळे अतिरिक्त ताणामुळे विद्युतदाहिनी मध्येच बंद पडण्याचा प्रकार सध्या घडत आहेत. दर आठ तासाला सरासरी 12 मृतदेह निगडी स्मशान भूमीतील दाहिन्यांमध्ये दाखल होत आहेत.

गेल्या 15 दिवसात 300 पेक्षा जास्त मृतदेह अंत्यविधीसाठी दाखल झाले. दिवस – रात्र मृतदेह जाळल्यामुळे “बिडाच्या चिमण्यांनीही ” (धुरांडे) दम सोडला आहे. त्यातच नुकतीच एक चिमणीही बदलण्यात आली.

अशा कठीण काळात परगावाहून अंतविधीसाठी आलेल्या लोकांना स्मशानभूमीत मदत करण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे कार्यकर्ते संतोष चव्हाण, तेजस सापरिया, विजय मुनोत व समिती अध्यक्ष विजय पाटील मात्र तत्परता दाखवत माणुसकी जपत आहेत.त्यांना धीर देऊन अंतविधीसाठी मदत करत आहेत.

प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” सध्या निगडीमधील ‘अमरधाम’ चे दृश्य अतिशय विदारक आहे, विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी  रुग्णवाहिकांच्या रांगा स्मशानभूमीत नजरेस पडत आहत. मृतदेहाला सुद्धा अंत्यविधीची प्रतीक्षा करावी लागत आहे. मृतदेह एक कडेला आणि नातेवाईक दुसऱ्या बाजूला ताटकळत अनेक तास प्रतीक्षा करत आहेत. त्यातच एखादी विद्युतदाहिनी बंद पडते. त्यामुळे प्रतीक्षेत अजून भर पडते. पुढची भयानकता पाहता महापालिकेने तातडीने अजून एक विद्युतदाहिनी उभी करणे अत्यावश्यक आहे. लोकसंख्येच्या गरजेनुसार शहरात 15 विद्युतदाहिन्यांची आवश्यकता आहे.पण सध्या फक्त 7 विद्युतदाहिन्या कार्यरत आहेत.त्यामुळे निगडी आणि पिंपरी या दोनही दाहिन्यांवर मोठा ताण पडत आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.