Nigdi news: अखेर निगडीतील महाराणा प्रताप उद्यानाच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी

तीन सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश ; भाजप कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांच्या मागणीला यश

एमपीसी न्यूज – निगडीतील महाराणा प्रताप उद्यानाच्या सुरक्षेसाठी तीन सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत.
अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सुरक्षारक्षक नेमण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी भाजप कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

निगडी बसस्थानकाच्या शेजारीच असणाऱ्या या उद्यानात स्थानिक नागरिकांची नेहमीच उठबस असते. पण, याच ठिकाणी दिवसा व रात्री काही मद्यपी वाटसरू येथे बिनधास्तपणे दारू पितात, उद्यानात दारूच्या बाटल्या इतरत्र पडलेल्या असतात.

याठिकाणी स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर आहे. रात्रीही बऱ्याच उशिरापर्यंत काही प्रेमी युगुल याठिकाणी बसलेले असतात, ही गंभीर बाब हातागळे यांनी उजेडात आणली होती.

महाराणा प्रताप उद्यानात सुरक्षारक्षक नेमण्याबाबत उद्यान व सुरक्षा विभागाने एकमेकांकडे बोट दाखवत चालढकल करण्याचा प्रयत्न केला. हातागळे यांनी केलेला सततचा पाठपुरावा यामुळे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी या उद्यानात 24 तासासाठी तीन सुरक्षारक्षक तातडीने नेमण्याचे आदेश दिले आहेत.

महाराणा प्रताप उद्यानाच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे भाजप कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.