Nigdi News : कोरोना काळात शारीरिक अंतर पाळा, मानसिक अंतर नको – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कोरोना काळात सर्वांनी शारीरिक आंतर पाळावे मात्र, मानसिक अंतर्गत पडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कोरोना प्रतिबंध मार्गदर्शन शिबिर निगडी पोलीस ठाणे येथे शुक्रवारी (दि. 30) पार पडले. या शिबिरात पोलिसांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश बोलत होते.

यावेळी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, डॉ. रोहन काटे, डॉ. अभिषेक करमाळकर, डॉ. भरत ओझा तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, कोरोना साथीची पहिली लाट आली त्यावेळी औषधांची कमतरता नव्हती. मात्र दुसऱ्या लाटेत औषधांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित यंत्रणा काम करत आहेत. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येकाने मदत करणे गरजेचे आहे.

पोलिसांनी कोरोना प्रतिबंध लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. लस घेतल्यानंतर खबरदारी घेण्यामध्ये हलगर्जीपणा करू नये. लस घेतल्यानंतर प्रत्येकाने काळजी घ्यावी. हेल्दी लाईफस्टाईल ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावे. कोरोना साथ कधी वाढेल सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी खबरदारी महत्त्वाची आहे.

ते पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कोरोना सेलने खूप चांगलं काम केलं आहे. कोरोना बाधित पोलिसांना मानसिक आधार देण्यासाठी सेलचे अधिकारी त्यांना भेटत होते. तसेच वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करून आधार देत होते. कोरोना रुग्णांशी सातत्याने बोलत राहा. त्यांच्या संपर्कात राहा. मानसिक आधार या परिस्थितीत फार महत्त्वाचा आहे. मला खात्री आहे पिंपरी चिंचवड पोलीस कधीच खचून जाणार नाहीत. आमचा लढा गुन्हेगारीशी आहे, तसेच कोरोनाशी देखील आहे.

हेल्दी लाइफस्टाइल बद्दल बोलताना आयुक्त म्हणाले, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांना प्रत्येकी 20 सायकल, हेल्मेट, टॉर्च, जॅकेट आदी साहित्य वाटप केले जाणार आहे. आतापर्यंत पोलीस चांगली पेट्रोलिंग करत आहेत. त्यात आणखी सुधारणा करत सायकल पेट्रोलिंग सुरू केली जाणार आहे.

सायकल पेट्रोलिंग आरोग्यवर्धक ठरेल. पोलीस आणि नागरिक मिळून ही पेट्रोलिंग करतील. पोलिसांना दिलेल्या स्मार्ट वॉचचे पॉईंट रीडीम करा, बक्षिसे मिळवा आणि हेल्दी राहा. त्याचबरोबर समाजाची चांगली सेवा करा, असेही आयुक्तांनी सांगितले.

सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी केले. निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता काढापान करून करण्यात आली. तसेच पिंपरी विभागात पोलिसांना हजेरीच्या वेळी आयुष काढा वाटप करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी सांगितले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.