Nigdi News : ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे संस्थापक वा. ना. तथा भाऊ अभ्यंकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्राचे संस्थापक आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे कार्यवाह ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वा. ना. तथा भाऊ अभ्यंकर (वय 79) यांचे आज (16 फेब्रुवारी) सकाळी हृदयक्रिया बंद पडून निधन झाले.

मागील दोन महिन्यापासून ते पक्षाघाताने आजारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी इंदिराबाई, कन्या, जावई, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. दुपारी 4 वाजता निगडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अंत्यदर्शनासाठी पार्थिव सकाळी अकरा ते दोन वाजेपर्यंत निगडी येथील ज्ञानप्रबोधिनीच्या शाळेत ठेवण्यात येणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही भाऊंच्या घरी गर्दी करु नये, असे आवाहन ज्ञानप्रबोधिनी केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

पंचकोषांवर आधारित शिक्षणपद्धती विकसित करण्यात भाऊंचा मोठा सहभाग होता. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगभूत गुणांची जाणीव व्हावी आणि त्यांनी सुजाण नागरिक व्हावे, यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतले. गणित, संस्कृत या विषयांचा हातखंडा असलेल्या भाऊ यांनी त्यांच्या अध्यापक कारकीर्दीची सुरुवात पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीत केली. त्यानंतर त्यांनी मागील 32 वर्षे निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेसाठी वाहून घेतले होते. तसेच मागील काही वर्षांपासून ते भागवत सप्ताहात प्रवचने देत असत.

अभ्यंकर यांचा जन्म कोकणात नारिंग्रे या गावी झाला. वयाच्या एकविसाव्या वर्षी ते पुण्यातील नूमवि प्रशालेत शिक्षक म्हणून रुजू झाले. ज्ञान प्रबोधिनी, पुणेचे संस्थापक वि. वि. तथा आप्पा पेंडसे यांच्यामुळे ते ज्ञान प्रबोधिनी पुणे येथे कार्यरत झाले. तेथे 14 वर्षे त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले होते. काही काळ त्यांनी ज्ञानप्रबोधिनी पुणेची कार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळली.

निगडीच्या ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. ज्ञानप्रबोधिनी निगडीच्या कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. अखेरपर्यंत ते ज्ञानप्रबोधिनीच्या कामात सक्रिय होते. त्यांनी मातृमंदिर विश्वस्त संस्थेची स्थापना केली. ज्ञान प्रबोधिनी निगडी शाळेचे ते सुमारे 35 वर्षे केंद्र प्रमुख होते.

शिक्षण व समाज सेवेमध्ये त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांचा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डिलीट पदवी देऊन सन्मान केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.