Nigdi News : भक्ती-शक्ती चौकातून पुणे-मुंबई महामार्गावरून आता विनाअडथळा जाता येणार; नव्या उड्डाणपुलाचे गुरुवारी उद्घाटन

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावरील भक्ती शक्ती चौकात सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहनांना दोन ते अडीच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत होते. मात्र, हा वळसा आता घालण्याची गरज राहणार नसून पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलाचे उद्घाटन उद्या (गुरुवारी, दि. 10) सकाळी दहा वाजता होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भक्ती शक्ती चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. भक्ती शक्ती चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.

वाहनांना दोन ते अडीच किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. उड्डाणपूल सुरु करण्याबाबत मंगळवारी (दि. 8) मनसे गटनेता सचिन चिखले यांनी महापौरांना निवेदन दिले होते.

भक्ती- शक्ती उड्डाणपुलावरील पुणे-मुंबई  महामार्गाचे दोन्ही बाजूंच्या लेनचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबई-पुणे व पुणे-मुंबई या दोन्ही लेन वाहतुकीसाठी गुरुवार (दि. 10) पासून सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अंभियांत्रिकी विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना दिली.

उड्डाणपुलाचे उद्घाटन गुरुवारी सकाळी दहा वाजता महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर महामार्गावरील दोन्ही बाजूंची थेट वाहतूक लगेच सुरु करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.