Nigdi news: मोबाईल टॉर्चच्या उजेडात ‘अंत्यसंस्कार’, निगडीतील अमरधाम स्मशानभूमीतील प्रकार..!

एमपीसी न्यूज – निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत गेल्या अनेक दिवसांपासून अंत्यविधीच्या ठिकाणी दिवे नसल्याने तेथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरीकांना चक्क मोबाइल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामुळे या स्मशानभूमीत तातडीने दिव्यांची व्यवस्था करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, माणसाच्या जीवनाची फरफट त्याच्या मृत्यूनंतरही कशी सुरू असते, याचा प्रत्यय निगडी येथील स्मशानभूमीत येत आहे. बिजलीनगर, प्राधिकरण, रूपीनगर निगडी, त्रिवेणीनगर आदी परिसरातील नागरिक अंत्यविधीसाठी निगडी स्मशानभूमीत येत असतात.

मात्र, येथे सायंकाळनंतर करण्यात येणाऱ्या प्रत्येक अंत्यविधी वेळी नागरिकांना पथदिवे नसल्याने अंत्यसंस्कारावेळी काळोखातच धडपड करावी लागते. शिवाय अक्षरशः मोबाइल टॉर्चच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

ज्या कुटुंबात मृत्यूसारखी दुर्दैवी घटना घडते त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्याचे अंत्यसंस्कार अंधारात करण्याची वेळ आली, तर त्यांच्या भावना काय असतील याचा विचार प्रशासनाने करण्याची गरज आहे. मात्र, महापालिकेने या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप खैरनार यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.