Nigdi News: महावितरण कार्यालयात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन

एमपीसी न्यूज – निगडी, प्राधिकरणातील महावितरण कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता कधीही उपलब्ध होत नसल्याने पिंपरी -चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने आज (गुरुवारी) गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. त्यांच्या खुर्चीवर पुष्पगुच्छ ठेऊन निषेध व्यक्त केला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला पुष्पगुच्छ दिला. कामकाजात सुधारणा करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आल्याची माहिती असोसिएशनने दिली आहे.

अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी कधीही उपलब्ध होत नाहीत. प्राधिकरण उपविभागीय कार्यालयात सकाळच्या सत्रात ज्यावेळी विज ग्राहक आणि अन्य नागरिकांच्या समस्या सोडवायला अधिकारी उपलब्ध असणे अपेक्षित असताना गेली अनेक महिने अधिकारी जागेवर नसल्याच्या तक्रारी आहेत.

त्यानुसार गुरुवारीही संबंधित अधिकारी कार्यालयात नव्हते. त्यानंतर असोसिएशनने ही बाब वरिष्ठ कार्यालयाच्या नजरेत आणून दिली.

गांधीगिरी मार्गाचा अवलंब करत पुष्पगुच्छ अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर ठेवत आंदोलन केले गेले. संबंधित अधिकाऱ्याला याची माहिती मिळताच ते कार्यालयात आले आणि नंतर तोच पुष्पगुच्छ त्यांना देऊन कामकाजात सुधारणा करून नागरिकांच्या समस्या सोडवा अशी विनंती संघटना पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.

पिंपरी आणि भोसरी विभागाच्या समस्या सोडविण्यासाठी एक बैठक लावण्याची मागणी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांना केली. त्यांनी लवकरच अशी बैठक लावण्याचे आश्वासन दिले.

संघटनेचे अध्यक्ष गिरीश बक्षी, कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर, सचिव नितीन बोंडे, संजीव पाटील, सुनील पवार, नटराज बोबडे, महेश माने आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.