Nigdi News: निगडी-रावेतला जोडणा-या उड्डाणपुलाचे काम मार्गी लावा – शर्मिला बाबर

एमपीसी न्यूज – भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक बीआरटीएस मार्गावर प्राधिकरणातील निसर्ग दर्शन सोसायटीजवळ लोहमार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. निगडी व रावेत या भागाला जोडणाऱ्या या उड्डाणपुलाच्या भुसंपादनासंबधित काही अडथळ्यामुळे हे काम अर्धवट स्थितीत आहे. महानगरपालिकेने सर्व अडथळे सामंजस्याने दूर करून तातडीने हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी सुरू करावा, अशी मागणी अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर यांनी केली आहे.

या संदर्भात बाबर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, निगडी भक्ती शक्ती चौक ते रावेतच्या मुकाई चौक या 45 मीटर रस्त्यावर निसर्ग दर्शन सोसायटी येथे रेल्वे लाईनवर उड्डाणपुल बांधण्यात येत आहे.

हा बीआरटीएस मार्ग सुरू करण्यासाठी या पुलाची नितांत गरज होती. त्या पध्दतीने या उड्डाणपुलाचे नियोजन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत करण्यात आले. त्यासाठी मे. बी. जे. शिर्के कन्स्ट्रक्शन या कंपनीला काम दिले आहे.

या उड्डाणपुलाच्या कामासाठी 60 कोटी 32 लाख 88 हजार 315 रूपये तर रॉयल्टीसाठी 17 कोटी 15 लाख 5२ हजार 676 रूपये असे मिळून 77 कोटी 48 लाख 40 हजार 691 रूपयांचा खर्च केला जात आहे.

उड्डाणपुलाच्या कामाबरोबर रेल्वे लाईनवर हा पूल असल्याने रेल्वेला देखील वेळोवेळी विविध कारणांसाठी महापालिकेने निधी दिला. त्यानुसार रेल्वे लाईनवरील काम देखील पूर्ण झाले. या उड्डाणपुलाच्या कामाची मुदत 2018 मध्ये संपली असून आतापर्यंत सुमारे 94.64 टक्के काम पूर्ण झाले आहे.

इतर रंगरंगोटीची कामे देखील पूर्ण झालेली आहेत. मात्र, हा उड्डाणपूल रावेतकडील बाजुने ज्या ठिकाणी खाली उतरतो. तेथील काही शेतक-यांचा जागेबाबत निर्णय प्रलंबित आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल सद्यस्थितीत अर्धवट आहे.

महापालिकेने येथील भुसंपादन व इतर सर्व अडथळे दूर करून या उड्डाणपुलाचे काम तातडीने पूर्ण करावे. जेणे करून कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला उड्डाणपूल नागरिकांसाठी उपयोगी पडेल. निगडी व रावेत भागाबरोबर जुना पुणे-मुंबई महामार्ग व पुणे-मुंबई द्रूतगती महामार्गाला देखील हा मार्ग जोडतो.

त्याव्दारे शहरातील वाहतूक सुरळित होण्यास मदत होणार असून निगडी प्राधिकरण, तसेच भक्ती शक्ती चौकातील वाहतुकीची कोंडी दूर होणार आहे. त्याचा शहरातील व शहराबाहेरील वाहतुकीसाठी फायदा होईल.

हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर बीआरटीएस बससेवा सुरू होऊ शकणार आहे. महानगरपालिका आयुक्त म्हणून आपण लक्ष घालून या उड्डाणपुलाचा विषय मार्गी लावून नागरिकांना सहकार्य करावे, असे बाबर यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III