Nigdi News : चाकोरी बाहेर जाऊन अंगभूत क्षमतांची चाचपणी करावी – ज्येष्ठ साहित्यिक रमेश वाकनीस

एमपीसी न्यूज – कोणत्याही साहित्यिक अन् कलावंताने जीवनातील चाकोरीत समाधान न मानता आपल्या अंगभूत कलाक्षमतांची चाचपणी करून स्वतःला सिद्ध करावे. असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि रंगकर्मी रमेश वाकनीस यांनी निगडी, प्राधिकरण येथे रविवारी (दि. 21) आपल्या निवासस्थानी व्यक्त केले.

जागतिक कविता दिनाचे औचित्य साधून शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी’ या उपक्रमांतर्गत रमेश वाकनीस यांचा ज्येष्ठ कवयित्री छाया कांकरिया यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. निर्मळ वाहत्या पाण्याप्रमाणे कवी वाकनीस यांचे जीवन प्रवाही आहे. असे, गौरवोद्गार महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी यावेळी काढले. ज्येष्ठ साहित्यिक माधुरी ओक आणि प्रदीप गांधलीकर यांनी आपल्या मनोगतांतून रमेश वाकनीस यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंची माहिती दिली.

सत्काराला उत्तर देताना रमेश वाकनीस म्हणाले, ‘बालपणापासूनच साहित्य, नाट्य, संगीत अशा ललितकलांचे प्रचंड आकर्षण होते. सुदैवाने कलाभिरुची असलेले मित्र लाभले. नाट्यक्षेत्रात खूप काळ उमेदवारी केली. त्यानंतर स्वतःची नाट्यसंस्था उभारून निःशुल्क अभिनय आणि अभिवाचन कार्यशाळांच्या माध्यमातून तरुण रंगकर्मी घडविले. त्याचबरोबर स्वतःचे ‘कला : छांदसी’ हे अनियतकालिक चालवून साहित्य चळवळीत थोडेबहुत योगदान दिले. मुक्त पत्रकारिता केली.

साहित्य आणि कलांचे छंद जोपासताना नोकरीतील तुटपुंज्या वेतनामुळे आर्थिक विवंचनांचा सामना करावा लागला. परंतु पत्नी अरुणा यांची खंबीर साथ लाभली. त्याच वेळी समांतरपणे विविध आकृतिबंधात साहित्यलेखन सुरु होते. बुद्धाच्या जीवनावरील कादंबरी लेखनाने मनाला विलक्षण समाधान दिले. साहित्य अन् कला या क्षेत्रांचे तरुणाईला अनिवार आकर्षण असले तरी कठोर परिश्रम आणि आपल्या क्षमतांचे भान ठेवल्याशिवाय यशप्राप्ती होत नाही‌. असं मत वाकनिस यांनी व्यक्त केले.

मुरलीधर दळवी, मैथिली वाकनीस, मीनल डेरे, अनघा कुलकर्णी, पिहू कुलकर्णी यांनी संयोजनात सहकार्य केले. शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक, अध्यक्ष सुरेश कंक यांनी सूत्रसंचालन केले. शामराव सरकाळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.