Nigdi News: रेडझोनमध्ये ‘एसआरए’ प्रकल्पाला परवानगी कशी ?, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

प्रकल्पाला परवानगी देणा-या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – शरदनगर, निगडी येथील सर्व्हे नंबर 56, 57 आणि 63 हा भाग रेडझोनमध्ये येत असतानाही तेथे एसआरए योजनेंतर्गत गृह प्रकल्पाचे काम सुरु आहे. रेडझोनमध्ये ‘एसआरए’ प्रकल्पाला परवानगी देण्यात आली आहे. याप्रकरणी यमुनानगर येथील सतिश मरळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच या प्रकल्पाला परवानगी देणा-या अधिका-यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

या याचिकेत महाराष्ट्र सरकार, भारत सरकारचा संरक्षण विभाग, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए), पिंपरी-चिंचवड महापालिका, पिंपरी-चिंचवड नगर भूमापन कार्यालय आणि रेन्बो डेव्हलपर्स यांना प्रतिवादी केले आहे.

तर, महाराष्ट्र सरकार, पीसीएनटीडीए, नगर भूमापन अधिकारी यांनी रेन्बो डेव्हलपर्स यांना परवानगी कशी दिली, याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेच्या वतीने निगडीतील सेक्टर 22 येथे ‘जेएनएनयूआरएम’अंतर्गत बांधण्यात आलेला झोपडपट्टी पुनर्वसन ग्रहप्रकल्प देहूरोड लष्करी डेपोच्या सीमा भिंतीपासून दोन हजार यार्डमध्ये येत आहे. 2019 च्या रेडझोनच्या नकाशानुसार तळवडेगाव, त्रिवेणीनगर, शरदनगर, रुपीनगर हा भाग रेडझोनमध्ये येत आहे.

रेडझोनमध्ये येत असलेल्या शरदनगर येथील सर्व्हे नंबर 56, 57 आणि 63 मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) योजनेंतर्गत गृह प्रकल्पाचे काम सुरु आहे. रेडझोनमध्ये बांधकामाला परवानी नसताना एसआरए प्रकल्पाला परवागी कशी दिली. परवानगी देणा-यांवर कारवाई करावी, अशी मागणी सतिश मरळ यांनी जनहित याचिकेतून केली आहे.

जो एसआरएला न्याय तोच यमुनानगरवासियांनाही द्या – मरळ

यमुनानगरमधील नागरिकांनी प्राधिकरणाकडून घरे घेतली आहेत. हा भाग रेडझोनमध्ये येत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. घरांची विक्री करता येत नाही. लोन मिळत नाही. रि-डेव्हल्पमेंट करता येत नाही. वारसाच्या नावाने मालमत्ता नोंद करता येत नाही. असे असताना रेडझोनमध्ये येत असलेल्या शरदनगरमध्ये एसआरएअंतर्गत गृहप्रकल्पाला परवानगी कशी देण्यात आली. जो एसआरएला न्याय, तोच यमुनानगरवासियांनाही द्यावा, अशी आमची मागणी असल्याचे मरळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.