Nigdi news : भक्ती-शक्ती उड्डाणपूलाच्या कामाची गती वाढवा; आयुक्तांची सूचना

एमपीसी न्यूज – भक्ती-शक्ती रोटरी उड्डाणपूल कामाची आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नुकतीच पाहणी केली. कंत्राटदाराला जलद गतीने काम करण्याच्या सूचना देत वाहतूक सुरळित करण्यासाठी मुंबईकडे जाणारा पूल खुला करण्याबाबत आयुक्त हर्डीकर यांनी सकारात्मक दर्शविली आहे, असे ‘अ’ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर यांनी सांगितले.

मुंबईहून पुण्याकडे येताना पिंपरी-चिंचवडचे प्रवेशव्दार म्हणून निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकाची ओळख आहे. येथील वाहतूक कोंडीपासून सुटका करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने रोटरी उड्डाणपूल हाती घेतला.

या कामासाठी नेमलेल्या संबधित ठेकेदारी कंपनीकडून संथ गतीने भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. संथ गतीमुळे चौकातील वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा पाहणी दौरा केला. यावेळी मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक उत्तम केंदळे, बीआरटीएस विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, उपअभियंता विजय भोजने यांच्यासह ठेकेदारी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे, मुंबईकडे जाणा-या वाहनचालकांना, तसेच स्थानिक नागरिकांना लांबचा वळसा घालून जावे लागते. त्यासाठी जवळपास काम पूर्ण झालेला पुण्याकडून मुंबईकडे जाणारा पूल तातडीने सुरू करण्याची मागणी शर्मिला बाबर यांच्यासह स्थानिक नगरसेवकांनी केली.

या संदर्भात आयुक्त हर्डीकर यांनी शहरातील वाहतुकीच्या सोयीसाठी या उड्डाणपूलाचे काम जलद गतीने करण्याच्या सूचना कंत्राटदार, तसेच संबधित अधिका-यांना दिल्या आहेत. त्यासह सद्यस्थितीत वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी उर्वरित कामे पूर्ण करून मुंबईकडे जाणारी पूलाची बाजू तातडीने सुरू करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.