Nigdi News : भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचा वर्तुळाकार मार्ग पूर्ण होऊनही बंद का ? : नागरिकांचा प्रशासनाला सवाल

एमपीसी न्यूज – श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज अर्थात भक्ती-शक्ती उड्डाणपुलाचा वर्तुळाकार मार्ग पूर्ण होऊनही हा उड्डाणपूल बंद का ?, असा सवाल करत हा पूल तत्काळ वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमने केली आहे.

पिंपरी चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर निगडी येथे पुणे-मुंबई महामार्ग आणि यमुनानगर ते निगडी प्राधिकरण रस्ता जिथे मिळतो त्या चौकातील हा दुमजली उड्डाणपूल आहे. शहराच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा ठरावा, असे अत्यंत आखीव रेखीव देखणे शिल्प येथे आहे. 2017 मध्ये सुरू झालेल्या या पुलाचे बांधकाम 2021 मध्ये पूर्ण झाले. यासाठी सुमारे 90 कोटी 54 लाख खर्च आला.

दुसऱ्या मजल्यावरचा पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलाचा मुख्य मार्ग सहा महिन्यापूर्वी सुरू केला, पण पहिल्या मजल्यावरचा रिंग रोड हा शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. तो पूर्ण झाल्याचे पत्र स्थापत्य विभागाने केव्हाच दिले, पण त्यानंतरही किरकोळ दुरुस्तीचे कारण देत या उड्डाणपुलाचा अत्यंत महत्वाचा मार्ग केवळ उद्घाटनाच्या प्रतिक्षेत बंद ठेवला आहे.

तीन वर्षे या उड्डाणपुलाच्या कामामुळे दीड-दोन किलोमीटरचा वळसा मारायचा त्रास जनतेने गपगुमान सहन केला. आता मार्ग पूर्ण होऊनही केवेळ उदघाटन कोणाच्या हस्ते करायचे यासाठी अत्यंत महत्वाचा लोकांच्या सोयिचा मार्ग बंद असल्याने लोक संतापले आहेत. हे मार्ग सुरू करा म्हणून नागरिकांनी आव्वाज टाकला, पण महापालिका प्रशासन, बीआरटी व्यवस्थापन कोणीही लक्ष दिले नाही. आमदार महेश लांडगे यांनी मध्यंतरी पाहणी करून मार्ग खुला करण्याचे आदेश दिले. त्यानंतरही प्रशासन हलले नाही.

महापालिकातील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी दोनच दिवसांपूर्वी एक पत्र प्रशासनाला दिले आणि मंगळवारपर्यंत मार्ग खुला केला नाही तर आमच्या पध्दतीने बुधवारी चारही मार्ग खुले करणार, असा इशारा दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या मार्गाचे उदघाटन करण्याची शिफारस त्यांनी या पत्राता केली आहे.

दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यासाठी वेळ मागितली आहे, पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे समजते. सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात आता श्रेयवादाची लढाई रंगली आहे. हा पूल राष्ट्रवादीच्या काळात मंजुर केल्याचे राष्ट्रवादी म्हणते, तर भाजपानेच काम सुरू केले आणि पूर्ण केल्याचे भाजपा नेत्यांचे मत आहे. या श्रेयवादाच्या लढाईत मार्ग कोणाच्या हस्ते सुरू करायचा हा प्रश्न प्रतिष्ठेचा झाल्याने मार्ग खुला करण्यास आणखी विलंब होतो आहे.

दरम्यान, या विषयावर शहरातील 40 स्वयंसेवी संस्था संघटनांचे प्रतिनिधी आता एकत्र आले असून रविवारी सकाळी या बंद ठेवलेल्या मार्गाची सर्वांनी पाहणी केली. मार्ग सुरू करण्यासाठी यावेळी महापौर माई ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, विरोधी पक्षेनेते राजू मिसाळ यांना सर्व नागरिकांच्या वतीने साद घातली.

मोबाईल स्पिकरवर संस्था प्रतिनिधींशी बोलताना महापौर माई ढोरे म्हणाल्या, राहिलेले किरकोळ काम लवकरच पूर्ण होऊन मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न आहे असे सांगितले.

आमदार महेश लांडगे म्हणाले, मी पाहणी केली आहे, काम पूर्ण झाले असून आता अधिक विलंब करण्यात अर्थ नाही. वाट न पाहता महापौर माई ढोरे यांच्याच हस्ते आम्ही हा मार्ग लवकरच सरू करत आहोत. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मी आज महापालिका प्रशासनाला पत्र देतो आहे आणि दोन दिवसांत मार्ग सुरू केला नाही तर शिवसेना स्टाईलने आम्ही आमच्यावतीने हा मार्ग सुरू करू. अशा प्रकारे आता मार्ग सुरू करण्याचा प्रश्न चांगलाच तापला आहे.

उड्डाणपुलाचा पहिल्या मजल्यावरील बंद असलेला वर्तूळाकार मार्ग सुरू झाल्यावर दीड-दोन किलोमीटरचा वळसा बंद होईल. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना सद्या वाहतूकनगरीत वळसा मारून जावे लागते, तर यमुनानगरकडून प्राधिकरणकडे जाणाऱ्या वाहनांना टिळक चौकातून वळसा मारून जावे लागते. हा मार्ग सुरू झाला की हा त्रास संपणार आहे.

काम पूर्ण होऊनही मार्ग सुरू होत नसल्याने हजारो वाहनांना लांबचा वळसा पडतो. त्यात वेळ, पैसा, इंधन असे लाखो रूपयांच्या राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होते. ते टाळण्यासाठी मार्ग सुरू करा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमचे तुषार शिंदे, तनपुरे फाऊंडेशनचे अशोक तनपुरे, भाऊसार व्हिजनच राजीव भावसार, रानजाई फाऊंडेशनचे धनंजय शेडबाळे यांच्यासह बहुसंख्य संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्हिडीओ क्लिप बनवून महापालिका प्रशासनाला पाठविल्या आहेत.

आता प्रतिक्षा प्रशासनाला जाग केव्हा येते आणि हा मार्ग सुरू कधी होतो त्याची आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.