Manohar Jambhekar : शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व मनोहर जांभेकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड मधील शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे मनोहर धोंडदेव (Manohar Jambhekar) तथा एम. डी. जांभेकर (वय 91) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. शहरातील औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था (एटीएसएस) व चैतन्य मेडिकल फाउंडेशनचे ते संस्थापक-अध्यक्ष होते.

त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी नलिनी, दोन मुली डॉ. अश्विनी कुलकर्णी, डॉ. दीपाली सवाई, जावई डॉ. अभय कुलकर्णी व सुनील सवाई तसेच चार नातवंडे व एक नातसून असा मोठा परिवार आहे.

मनोहर जांभेकर (Manohar Jambhekar) यांच्या पार्थिवावर आज (शनिवारी) दुपारी साडेचार वाजता चिंचवड लिंक रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

शिक्षण क्षेत्रातील एक तारा निखळला

मनोहर जांभेकर या नावाला पुणे- पिंपरी-चिंचवड परिसरात एक विशेष ओळख आहे आणि याला कारणही तसेच आहे. स्वतः उपजिविकेसाठी नोकरी करत असताना शैक्षणिक क्षेत्रात स्वतः झोकून देऊन त्यांनी एक आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे आणि ते म्हणजे अगदी सर्वसामान्य परिस्थितीतही पाहिलेले स्वप्न, कष्टाने आणि जिद्दीने प्रत्यक्षात उतरवता येते.

जांभेकर (Manohar Jambhekar) यांचा जन्म कोकणात डोर्ले या गावी 13 नोव्हेंबर 1931 रोजी झाला. जांभेकर म्हणजे अत्यंत महत्त्वाकांक्षी, प्रचंड मेहनत करायची तयारी, अत्यंत बुद्धिमान, गणित, इतिहास या विषयांची आवड आणि त्यांचा चांगला अभ्यास असलेले उमदे व्यक्तिमत्व. त्यांनी विल्सन कॉलेजमध्ये बी.एससी. (ऑनर्स) ही पदवी प्राप्त करून, नंतर कायद्याची एल.एल.बी. पदवी प्राप्त केली.

Dehuroad News : श्री क्षेत्र भंडारा डोंगरावरील मंदिर निर्माणाच्या कामाला गती

चरितार्थासाठी पुण्यातील नामांकित इनव्हेस्टा मशिन टूल्स कंपनी मध्ये ट्रेनिंग ऑफिसर म्हणून नोकरी केली. त्यावेळी पिंपरी चिंचवड परिसरात अनेक कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची नीतांत आवश्यकता होती. इथल्या बेरोजगार तरुणांना कौशल्य शिक्षणाची किती गरज हे जांभेकर यांनी कंपनीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटवून दिले. आणि स्वतः कामगारांसाठी वर्ग सुरु केले. तेव्हा त्यांच्या मनात आले की, आपण स्वतःची शैक्षणिक संस्था स्थापन करावी जी गरजू, होतकरी मुलांना नोकरी मिळवून देऊ शकेल.

एटीएसएसची स्थापना

आपल्या कोकणातील समविचारी मित्रांना घेऊन 1964 साली जांभेकर (Manohar Jambhekar) यांनी भाड्याच्या छोट्याशा जागेत ‘औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था’ [ATSS] स्थापन केली. त्यांच्या सुविद्य पत्नी नलिनी जांभेकर यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक चढ-उतारांमध्ये त्यांची साथ दिली.

या सर्व कुटुंबाची साधी राहणी, जीव ओतून काम करण्याची तयारी, कायम विद्यार्थ्यांना सगळे काही सर्वोत्तम देण्याची आस, कर्मचाऱ्यांना कुटुंब मानण्याची वृत्ती सर्वांना परिचित आहे. या सर्वाना देखील वैयक्तिकरित्या शिक्षण क्षेत्रात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. एके काळी आपल्या दोन्ही उच्चशिक्षित कन्या डॉ. अश्विनी (कुलकर्णी) आणि डॉ. दीपाली (सवाई) यांना संधी असतानाही परदेशात न जाता आपल्या देशातच उत्तम काम करण्याचा सल्ला जांभेकर यांनी दिला.

Rathasaptami Special : रथसप्तमी चे खगोलशास्त्रीय महत्व

गेली 60 वर्षे निरपेक्ष भावनेने पिंपरी-चिंचवड परिसरात भरीव शैक्षणिक कार्य करणारे मनोहर जांभेकर, पिंपरी- चिंचवड शहराच्या विकासास हातभार लावणारी अशी औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था त्यांनी उभी केली आणि समर्थपणे गेली अनेक वर्षे ते ती उत्कृष्टपणे चालवत होते. आता त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांचे शैक्षणिक कार्य अधिक उंचीवर नेत आहे.

फोर्ड फाऊंडेशन रीसर्च स्कॉलरशिप

शेतीविषयक केलेल्या कामाची दखल घेऊन 1977 मध्ये जांभेकर (Manohar Jambhekar) यांना फोर्ड फाऊंडेशन रीसर्च स्कॉलरशिप मिळाली आणि फिलिपिन्समध्ये कृषी अभियांत्रिकीमध्ये शिकण्याची संधी मिळाली. तेथून नावीन्यपूर्ण यंत्रांची माहिती शिकून परत आल्यावर आपल्या देशातील मुलांना अशा प्रकारच्या शिक्षणाची किती गरज आहे, हे प्रकर्षाने जाणवले आणि त्यांनी महाराष्ट्रातील पहिले खाजगी मान्यताप्राप्त आय. टी. आय. सुरु केले.

‘आयआयसीएमआर’ची स्थापना

जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यावर आणि संगणक युगाचा उदय झाल्यावर देशातील कारखाने, उद्योग यांची मनुष्यबळाची गरज बदलली पिंपरी- चिंचवड मधील विद्यार्थ्यांना अशा नोकर्‍या मिळवण्यासाठी पदवी, पदव्युत्तर शिक्षणाची गरज भासू लागली. त्यासाठी पुण्यामध्ये जावे लागत होते त्यांना ते इथेच उपलब्ध करून देण्यासाठी मग ‘इन्स्टीट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल अँड कॉम्पुटर मॅनेजमेंट अँड रिसर्च’ आणि College of Business studies and computer application ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न संस्था सुरु जागतिक दर्जा करण्यात आली. संस्थेमध्ये ए.आय.सी.टी.ई., न्यू दिल्ली मान्यताप्राप्त MCA, MBA असे कॉलेजच्या व तांत्रिक आणि व्यावसायिक नोकरी साठी पूरक अभ्यासक्रम सुरु करून काळाच्या गरजेप्रमाणे परदेशातील उद्योगधंदे पूरक ज्ञान देण्याचे संस्थेचे उद्दिष्ट पूर्ण केले.

फिजिओथेरपी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ

लोकांची जीवनशैली, संगणकावरील काम, व्यायामाची कमतरता, बैठ्या कामामुळे बदलत चालली होती. यातून नवीन शारीरिक व्याधी वाढू लागल्या होत्या. अशावेळी  फिजिओथेरपीसारख्या उपचारांची वाढती गरज ओळखून 1992 साली जांभेकर (Manohar Jambhekar) यांनी महाराष्ट्रातील पहिले खाजगी मान्यता प्राप्त चैतन्य मेडीकल फिजिओथेरपी महाविद्यालय  सुरू केले.

सिटी प्राईड स्कूलचा विस्तार

पिंपरी-चिंचवडच्या शालेय शैक्षणिक विकासामध्ये आज सिटी प्राईड शाळा अग्रमानांकित मानली जाते. देश-विदेशातील अनेक पुरस्कार शाळेला मिळाले आहेत. मागणीच्या प्रचंड रेट्यामुळे आता शहराच्या तीन टोकांना शाळेच्या तीन शाखा सुरू झाल्या आहेत आणि तरीही पालकांच्या शाळेवरच्या प्रचंड विश्वासामुळे त्याही कमी पडत आहेत. जांभेकर हे गुणवत्तेबाबत कायम आग्रही होते. त्यामुळे त्यांनी संस्थेच्या शाळा, महाविद्यालयांना NAAC, NABET अशी गुणवत्ता मानके मिळाली आहेत.

कोकणावरील प्रेम

हे सर्व करतानाही जांभेकर (Manohar Jambhekar) आपले मूळ कधीही विसरले नाहीत. कोंकण हे त्यांचे पहिले प्रेम! कोंकण आणि कोंकणी माणसावरील माया तसूभरही कमी झाली नाही. स्वतःच्या सुरवातीच्या अडचणीच्या काळातून जरा बाहेर आल्यावर लगेच 2006 साली जांभेकर आणि त्यांच्या कोंकणी सहकाऱ्यांनी ‘कोंकण विकास मंच’ स्थापून कोकण विकासाचा योजनाबद्ध आराखडा तयार केला. आज अनेक कोंकणी विद्यार्थी संस्थेत शिकून पायावर उभे राहिले आहेत.

दिव्यांग मुलांसाठी ‘जिद्द’ 

केवळ पुण्यातच नाही तर गेली अनेक वर्षे कोंकणातील ‘जिद्द’ या अपंग मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या धर्मादाय संस्थेचे ते अध्यक्ष होते. या संस्थेत अपंग, मुकबधीर मुलांना नाममात्र शुल्कात शिक्षण दिले जाते. सरांनी, कोव्यास – KOWYAS (Konkan Women, Youth and Students Development Society) ही संस्था 2004 साली स्थापन केली बरेच वर्ष या संस्थेचे अध्यक्षपद भूषवून नवनवीन उपक्रम सुरु करण्यास त्यांनी मार्गदर्शन केले.

विविध पुरस्कारांनी कार्यगौरव

सरांच्या गेल्या अनेक तपांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनेही त्यांच्या शैक्षणिक कार्याचा उचित गौरव केलेला आहे. शिक्षण गौरव पुरस्कार, कोंकण भूषण, रोटरी व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार, पीसीएमसी आयकॉन यांसारखे अनेक पुरस्कार जांभेकर (Manohar Jambhekar) यांना मिळालेले आहेत. त्यांच्या विविध महाविद्यालये तसेच शाळांनासुद्धा अनेक देश विदेशातील संस्थानी गुणवत्तेसाठी प्रमाणीत केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.