Nigdi News: दुर्गादेवी टेकडी येथे महापालिका अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरविणार, अमित गोरखे यांचा पाठपुरावा

एमपीसी न्यूज – निगडीतील दुर्गादेवी टेकडी येथे दररोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसाठी महापालिकेतर्फे अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यावर कार्यवाही सुरु आहे. यासाठी भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी पाठपुरावा केला होता.

दुर्गादेवी टेकडी येथे मॉर्निंग वॉकसाठी सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध परिसरातून 1 हजारपेक्षा जास्त नागरिक येत असतात. ही संख्या शनिवार, रविवारी 2 ते 3 हजार लोकांपर्यंत जाते. मॉर्निंग वॉकला आलेले कुंदन ढाके यांचे हृदयविकाराच्या धक्याने 28 डिसेंबर 2020 रोजी निधन झाले. त्यांना तेथे अत्यावश्यक वैद्यकिय सेवा मिळाली असती तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. या आधीही अशा घटना तिथे घडल्या आहेत.

अशावेळेस तेथे रुग्णवाहिका अथवा महापालिका डॉक्टरांची टीम सकाळच्या वेळेत उपलब्ध असल्यास नागरिकांना अत्यावश्यक वेळी मदत होईल. त्यासाठी दुर्गादेवी टेकडी येथे रुग्णवाहिका आणि वैद्यकिय सेवा उपलब्ध करण्याची मागणी भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी महापालिका वैद्यकीय विभागाकडे केली होती.

त्यांच्या पत्राला महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी उत्तर दिले आहे. निगडीतील दुर्गादेवी टेकडी येथे दररोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांसाठी सकाळी 6 ते 9 या वेळेत येथे रुग्णवाहिका, वैद्यकिय डॉक्टरांची टीम उपलब्ध करुन देण्याबाबत कळविले आहे. हे पत्र वैद्यकिय विभागास प्राप्त झाले आहे. पत्रावर पुढील कार्यवाही वैद्यकिय विभागामार्फत अलहिदा करण्यात येत आहे. कार्यवाहीबाबत आपणास माहिती देण्यात येईल, असे डॉ. साळवे यांनी पत्राद्वारे गोरखे यांना कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.