Nigdi news: भक्ती शक्ती पुलाचे ‘जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज’ (भक्ती-शक्ती) उड्डाणपूल’ असे नामकरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उभारण्यात येत असलेल्या पुलाला ‘जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज’ (भक्ती-शक्ती) उड्डाणपूल असे नामकरण करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आज अखेर महापालिकेच्या महासभेत मान्य करण्यात आला. यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटर बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्पामधील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. सद्यस्थितीत रोटरी व ग्रेड सेपरेटरचे काम पूर्णत्वाकडे आहे.

प्रकल्प चालू करण्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार यांनी 25 मे 2018 रोजी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. ‘ निगडी भक्ती-शक्ती चौक येथून जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळयाचे वारकरी सांप्रदायासह पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होते.

अवघ्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील जनसमुदाय हा संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी निगडी येथे जमलेला असतो. त्यामुळे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून निगडी भक्ती शक्ती चौक येथे बांधण्यात येणा-या उड्डाणपुलास “जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज (भक्ती शक्ती)” उड्डाणपूल ‘ असे नाव देण्यात यावे,अशी मागणी करण्यात आली होती.

याची दखल घेत या पूर्वी ‘फ’ प्रभाग समितीने 4 जून 2018 रोजी या उड्डाणपुलाचे नामकरण ‘जगद्गगुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज’ (भक्ती-शक्ती) करण्याचा ठराव मंजूर केला होता.

तथापि, महापालिका कार्यक्षेत्रातील प्रकल्पांना नाव देण्यापूर्वी महासभेची मान्यता घेणे आवश्यक असते.या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी महासभेसमोर ठेवला होता, अखेर हा प्रस्ताव आज झालेल्या महासभेत मान्य करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.