Nigdi News: भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करा : राजू मिसाळ

एमपीसी न्यूज – निगडीतील भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केली आहे.

याबाबत महापौर उषा ढोरे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात मिसाळ यांनी म्हटले आहे की, पिंपरी- चिंचवड शहराच्या प्रवेशव्दारावरील निगडी येथील भक्ती शक्ती येथील उड्डाणपुलाचे काम दोन आठवड्यापूर्वी पूर्ण झालेले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्ताकाळात मान्यता मिळालेल्या शहरातील महत्वकांक्षी प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे. पुणे – मुंबईकडील वाहतुक सुरळीत होण्यासाठी त्याचप्रमाणे या चौकात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून या उड्डाणपुलाचे नियोजन करण्यात आले होते.

या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले आहे. त्यामुळे हा पूल वाहतूकीसाठी खुला करणे गरजेचे आहे. पूल बंद असल्यामुळे या परीसरातील नागरीकांची गैरसोय होत आहे. पुलाचे काम पूर्ण झाले असूनही हा पूल बंद असल्यामुळे नागरीकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे या परीसरातील नागरीकांच्या भावना लक्षात घेऊन पूल वाहतूकीसाठी त्वरीत खुला करणे गरजेचे आहे.

या अनुषंगाने भक्ती शक्ती उड्डाणपूलाचे उदघाटन उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व महापौरांच्या अध्यक्षतेखाली तसेच शहरातील विविध मान्यवरांच्या उपस्थित करण्याचा मानस आहे. त्यासाठी निगडी उड्डाणपुलाचे उदघाटन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात यावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.