Nigdi News : खेळाडूंनी खेळाप्रती प्रामाणिक राहून आपल्या देशाचे नाव उंचवावे – धनराज पिल्ले

एमपीसी न्यूज – ‘पढ़ोगे लिखोगे तो बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे तो बनोगे खराब’ असं आपल्याकडे म्हटले जाते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वांनीच भारतीय खेळाडूंचे यश पाहिले. खेळात पैसा आणि प्रतिष्ठा नसते असे नाही. सूवर्ण पदक विजेता नीरज चोप्राच्या यशाकडे पाहून बऱ्याच पालकांच्या ही बाब लक्षात आली असेल. त्यामुळे खेळाडूंनी खेळाप्रती प्रामाणिक राहून आपल्या देशाचे नाव उंचवावे, असे धनराज पिल्ले यांनी सांगितले.

डीएफएल मिडिया, अजिंक्य क्रिकेट क्लब कै. बल्लाळ चिपळूणकर यांच्या वतीने हॉकीचे जादुगार पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांच्या 116 व्या जयंतीनिमित्त ‘मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स ॲन्ड सोशल अवॉर्ड 2021’चे आयोजन करण्यात आले होते. थरमॅक्स चौक, वी हॉटेलमध्ये आज (रविवारी, दि.29) हा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी धनराज पिल्ले बोलत होते.

यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय महाराष्ट्र हॉकीचे मनोज घोरे, उपाध्यक्ष मनिष आनंद, गुरुराज चरणंजीमठ, नरेश गोला, मनोज कदम आणि श्रीधर तंबा आदी उपस्थित होते.

यावेळी क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, पावर लिफ्टींग, बेस बॉल इ. खेळांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या राष्ट्रीय तसेच, स्थानिक खेळाडूंचा धनराज पिल्ले व कृष्णप्रकाश यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

धनराज पिल्ले म्हणाले, ‘आज सन्मान केलेल्या अनेक खेळाडू सोबत मी खेळलो आहे तर, उपस्थित अनेक जेष्ठ खेळाडूंना बघून आम्ही खेळायला लागलो जे आमच्यासाठी नेहमी प्रेरणास्थान राहिले आहेत. येत्या काळात महाराष्ट्र हॉकी सोबत चांगले काही करता येईल का, यासाठी मी प्रयत्न करेन’, असे धनराज पिल्ले म्हणाले. ‘टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. अनेक मुलांना खेळात चांगली गती आहे त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करुन खेळात प्रगती करावी,’ असा मार्गदर्शनपर सल्ला पिल्ले यांनी दिला.

मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. या दिवसाला शोभेल असा हा यथोचित कार्यक्रम असल्याचे उद्गार पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी काढले. कृष्णप्रकाश यांनी 1936 साली भारताचा जर्मनी सोबत झालेल्या हॉकीचा मुकाबल्याचे वर्णन केले. मेजर ध्यानचंद यांचा खेळ पाहून हिटलर मैदान सोडून गेल्याचे देखील त्यांनी यावेळी नमूद केले. मेजर ध्यानचंद यांना हिटलरने आपल्या सैन्यात मोठी पोस्ट देतो असे सांगितले मात्र, मेजर ध्यानचंद यांनी ती नाकारली असे कृष्णप्रकाश यांनी नमूद केले.

आज आपल्याला मेजर ध्यानचंद यांची आवश्यकता आहे. आपल्याकडे गुणी खेळाडू आहेत पण सुविधांचा अभाव असल्यामुळे जगातील सर्वोत्तम खेळाडू आपण निर्माण करण्यास कमी पडत असल्याची खंत पोलीस आयुक्तांनी नमूद केले. नुकत्याच पार पडलेल्या टोकीयो ऑलिम्पिकमध्ये आपल्या महिला व पुरुषांच्या हॉकी टिमने उत्कृष्ट कामगिरी केल्याचे सर्वांनी पाहिले. एकत्रित प्रयत्न आणि जिद्दीने आपण धेय्य गाठू शकतो यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊ, प्रयत्न करु आणि जे ध्येय गाठायचे आहे ते गाठू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमात खालील खेळाडूंचा झाला सन्मान
गोपीचंद परदेशी (फुटबॉल राष्ट्रीय खेळाडू), व्हीकटर झेव्हीयर (हॉकी आणि फुटबॉल राष्ट्रीय खेळाडू), एस एम वालन (फुटबॉल राष्ट्रीय खेळाडू), के. टी. पिल्ले (हॉकी राष्ट्रीय खेळाडू), देवदास मार्टीन (हॉकी राष्ट्रीय खेळाडू), लतिफ शेख (हॉकी राष्ट्रीय खेळाडू), गणेश पिल्ले (हॉकी राष्ट्रीय खेळाडू), शैलेश बनसोडे (हॉकी राष्ट्रीय खेळाडू), सुरेश रसाळ (हॉकी राष्ट्रीय खेळाडू), प्रकाश मोहरा (पावर लिफ्टर), भुपिंदर सिंह (हॉकी आणि फुटबॉल राष्ट्रीय खेळाडू), अबिद सय्यद (हॉकी राष्ट्रीय खेळाडू), प्रवीण गायकवाड (हॉकी राष्ट्रीय खेळाडू), यशोधन पवार (हॉकी राष्ट्रीय खेळाडू), व्हिकटर ॲन्थोनी (हॉकी राष्ट्रीय खेळाडू), मॅथ्यू सुसिनताथन (फुटबॉल राष्ट्रीय खेळाडू), नागेस्वरे राव (रणजी क्रिकेट खेळाडू), वैशाली सुल (आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू), मनिष आनंद (अध्यक्ष, पुणे हॉकी), गुरुराज चरणंजीमठ (सामाजिक आणि शैक्षणिक कार्यकर्ते) अनिल फसगे (हॉकी राष्ट्रीय खेळाडू), रिना गुप्ता (आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू), चिन्मय कोरड (हॉकी राष्ट्रीय खेळाडू), अनिल पिन्टो (हॉकी राष्ट्रीय खेळाडू), विजय जदाळे ( राष्ट्रीय क्रिकेट खेळाडू), ज्ञानेश्वरी लोखंडे (राष्ट्रीय कुस्तीपटू), गौरी उत्तुरे (राष्ट्रीय कुस्तीपटू), मारुती आडकर (राष्ट्रीय कुस्तीपटू), एम. ए. बेलीअप्पा (हॉकी राष्ट्रीय खेळाडू), फ्रॅंक नॉर्मन ( राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू) या खेळाडूंना यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर तंबा यांनी केले तर, नरेश गोला यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.