Nigdi News : शिक्षकदिनी ‘नृत्यकला मंदीर’च्या वतीने गुरू-शिष्य परंपरा दर्शवणा-या  ‘भरतनाट्यम् अरांगेत्रम’चे सादरीकरण

एमपीसी न्यूज – शिक्षक दिनानिमित्त ‘नृत्यकला मंदीर’च्या वतीने ‘हरी हर’ संकल्पनेवर आधारित गुरू-शिष्याचं नातं दृढ करणारा नृत्य कार्यक्रम पार पडला. ज्येष्ठ नृत्यांगना डॉ. सुचेता चापेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 05) मनोहर वाढोकर हॉल, निगडी येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी अदिती रानवडे आणि विद्युलता खत्री यांनी ‘भरतनाट्यम् अरांगेत्रम’चे सादरीकरण केले.  

‘नृत्यकला मंदीर’ ही सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका तेजश्री अडिगे संचालित पिंपरी चिंचवड येथील प्रथितयश नृत्यप्रशिक्षण संस्था आहे. संस्थेला 25 पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘अरांगेत्रम’ हा गुरू शिष्यापरंपरा दर्शवणारा सोहळा आहे.

हरी-हर कार्यक्रमाची सुरूवात ‘विष्णू स्तुती’ने झाली त्यानंतर, ‘अलारीपू’ भरतनाट्यम् ,  नाटराजाचे गुणवर्णन करणारी ‘नरेश कौतुकम’ आणि स्वर आणि ताल याचे वर्चस्व असणारी ‘जतिस्वराम’ ही रचना सादर करण्यात आली. कार्यक्रमात पुढे प्रत्येक युगात दुष्टांचा नाश करणारी भरतनाट्यम शैलीतील ‘विष्णू दशावतार कथा’ सादर झाली. नृत्याची सर्वांत गतीमय रचना ‘तिल्लाना’ सादर केल्यानंतर ‘हरी हरास वंदन’ या तंजावरच्या शहाजी राजे लिखित ‘गीत मंगल’ सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

गुरू सुचेता या तेजश्री अडिगे यांच्या गुरू आहेत. तर, नृत्य सादर केलेल्या अदिती आणि विद्युलता या तेजश्री अडिगे यांच्या मागील दहा वर्षांपासून शिष्या आहेत. शिक्षकदिनी दोन शिष्यांनी आपल्या गुरूना नृत्य सादर करून अनोखी मानवंदना दिली.


या वेळी कलावर्धिनीच्या संस्थापिका गुरू सुचेता चापेकर यांच्या हस्ते नृत्यागंना अदिती आणि विद्युलता यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. ‘पारंपरिक नृत्यकला जपणे त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. गेली 25 वर्षे नृत्यकला मंदिरच्या माध्यमातून तेजश्री अडिगे हे काम करत आहेत. कोरोना काळात देखील त्यांनी प्रशिक्षणात सातत्य राखले हे कौतुकास्पद आहे, ‘ असे चापेकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे निवेदन नीरजा आपटे यांनी केले. गायन शिवप्रसाद, व्हायोलिन सतीश शेषद्री, मृदंग साथ श्रीराम सुभाराम, नटूवांगंम तेजश्री अडिगे यांनी वाद्यसाथ दिली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संजीवनी खत्री, अमर खत्री, सुजाता, भानुदास रानवडे, सिद्धी कटारिया, अनुष्का बैरागी, धनिष्ठा यादव, कुमुदिनी पाटील, मीनाक्षी विवेक यांनी सहकार्य केले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.