Nigdi News: संग्रामनगरमधील लाभार्थ्यांचे त्वरीत पुनर्वसन करा

एमपीसी न्यूज – निगडी सेक्टर 22 येथील संग्रामनगर झोपडपट्टीतील पात्र 160 लाभार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात अजंठानगर येथील पत्राशेडमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. मात्र, या लाभार्थ्यांना घरापासून वंचित ठेवल्याने त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने त्वरीत कायदेशीर पूर्तता करून या लाभार्थ्यांना हक्काचे घर द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे.

पक्षाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, युवक आघाडीचे शहराध्यक्ष गुलाब पानपाटील, रमेश गायकवाड, संजय वाघमारे, शरद वाघमारे, नितीन कसबे, शशिकुमार टोपे, अ‍ॅड. मिलींद कांबळे, ईश्वर कांबळे आदींच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. संग्रामनगर झोपडपट्टीतील पात्र 160 झोपडीधारकांचे सन 2009 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात दोन महिन्यांसाठी स्थलांतर करण्यात आले होते.

त्यांचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत पुनर्वसन करणे गरजेचे असताना त्यांना बेघर करून घरापासून वंचित ठेवले आहे. महापालिकेने संग्रामनगर झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे घर मिळावे यासाठी राज्य किंवा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. जिल्हाधिका-यांकडेही यासंदर्भात पाठपुरावा करून तात्काळ कार्यवाही करावी. तसेच महापालिकेच्या संबंधित अधिका-यांविरूद्ध निष्काळजीपणा केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी, असे निवदेनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.