Nigdi News: सायक्लोथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, तीन हजारहून अधिक स्पर्धकांनी घेतला सहभाग

एमपीसी न्यूज – आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीच्यावतीने आयोजित सायक्लोथॉन स्पर्धेत शहरातील 3 हजार पेक्षा जास्त  स्पर्धकांनी सहभाग घेतला. तीन गटात झालेल्या या स्पर्धेची सूरूवात निगडी भक्ती – शक्ती येथून आज (रविवारी) सकाळी 6 वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडी दाखवून झाली. स्पर्धेनंतर झुम्बा, योगा कार्यक्रमात सहभागी होवून स्पर्धकांनी आनंदोत्सव साजरा केला. तसेच, स्पर्धेत 83 वयोवर्ष असलेल्या ज्येष्ठ स्पर्धकास सायकल भेट देण्यात आली.

यावेळी उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, मनसे गटनेता सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, माजी उपमहापौर शैलजा मोरे, टाटा मोटर्स युनियन अध्यक्ष सचिन लांडगे, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, उपायुक्त मनोज लोणकर, सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क विभाग प्रमुख अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता विजय भोजणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रेरणा शिनकर, अ क्षेत्रिय अधिकारी सुजाता पानसरे, चंद्रकांत धानोरकर, सुनील पवार, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थीत होते. स्पर्धेत अविरत श्रमदान संघटना, पतंजली योग समिती, झुम्बा क्लबने सहभाग घेतला.

शहरातील प्रदूषण टाळण्यासाठी व आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सायकल प्रवास गरजेचा आहे. शहरात सायकल चालवणाऱ्यांची संख्या वाढविण्याकरीता महापालिकेच्या माध्यमातून रस्ते, सायकल मार्ग तयार करण्याचे प्रयत्न सूरू आहेत. त्यासाठी नागरिकांनी देखील या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी केले.

1 ते 3 ऑक्टोबर 21 या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनांनुसार नऊ थीम्सच्या आधारावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांमार्फत आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या तीन दिवसीय महोत्सवात नागरिकांना विविध कार्यक्रमांची मेजवानी लाभली. निगडी येथील रोटरी पूलाच्या अंडरपासमध्ये विद्यार्थ्यांनी थिम बेसीसवर वॉल पेंटींग पूर्ण केले आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींनी सुदधा सहभाग घेतला.

सायक्लोथॉन स्पर्धेचे स्वरुप राष्ट्रीयस्तराचे असून यामध्ये 500 पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला. यात लहान मुले, सर्वसाधारण गट तसेच सराव करणा-या खेळाडूंसाठी 7 कि.मी., 15 कि.मी. आणि 75 कि.मी. अंतराची स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे अंतर पूर्ण करणा-या खेळाडूंचा पदक देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्पर्धकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी महापालिका डॉक्टरांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.