Nigdi News: भक्ती-शक्ती उड्डाण पुलाचा वर्तुळाकार मार्ग दहा दिवस राहणार बंद

महापौरांच्या महापालिका प्रशासनाला सूचना; अपघात वाढल्याने सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना करणार

एमपीसी न्यूज – निगडीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज अर्थात भक्ती-शक्ती उड्डाण पुलावर अपघात वाढत असल्याने सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना तातडीने कराव्यात. दिशादर्शक फलक, स्पीड ब्रेकर टाकावेत. त्यासाठी वर्तुळाकार मार्ग उद्यापासून दहा दिवस बंद ठेवावा, अशा सूचना महापौर उषा ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान, मुंबईकडून पुण्याकडे आणि पुण्याकडून मुंबईकडे जाणारा मार्ग चालू राहणार आहे.

वर्तुळाकार मार्ग पूर्ण होऊनही प्रशासन, सत्ताधारी भाजपकडून उद्घाटन केले जात नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने 30 जून रोजी पूल वाहतुकीसाठी खुला केला होता. परंतु, पुलावर अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी आज (सोमवारी) पुलाची पाहणी केली. उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक अमित गावडे, प्रा.उत्तम केंदळे, नगरसेवक सचिन चिखले, नगरसेविका शैलजा मोरे, कमल घोलप, शर्मिला बाबर, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे आदी उपस्थित होते.

महापौर ढोरे म्हणाल्या, पुलाचे काम अपूर्ण आहे. छोटी छोटी कामे बाकी आहेत. विरोधकांनी श्रेय घेण्यासाठी पुलाचे उद्घाटन केले. दिशादर्शक फलक नाहीत. स्पीड ब्रेकर टाकणे गरजेचे आहे. स्पीड लिमिटचे दिशा दर्शक फलक लावणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने दहा दिवसांचा वेळ लागेल असे सांगितले आहे. त्यामुळे सुरक्षिततेची कामे करण्यासाठी पूल दहा दिवस बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले, अर्धवट कामे पूर्ण केले जाणार आहेत. पुलावर अपघात होत आहेत. दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालक गोंधळातो. स्पीड ब्रेकर, दिशादर्शक, स्पीड लिमिटचे फलक लावण्यात येणार आहेत. सुरक्षितेची कामे केली जाणार आहेत.

सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, “दिशादर्शक, स्पीड लिमिटचे फलक, स्पीड ब्रेकर टाकण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. त्यासाठी वर्तुळाकार मार्ग, ग्रेडसेपरेटर बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत पोलिसांना सांगितले जाईल. वाहतूक कुठे वळवायची याची पाहणी पोलिसांकडून केले जाईल. त्यानंतर पोलिसांकडून नोटिफिकेशन निघेल.”

मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले, भक्ती-शक्ती उड्डाण पुलावर गेले महिन्याभरात 3 नागरिकांचा अपघाती मुत्यू झाला आहे.  यापुढे कोणालाही जीव गमवावा लागू नये. यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. लवकरात लवकर राहिलेले काम पूर्ण करावे, अशी मागणी महापौर व आयुक्त यांच्याकडे केली होती. अन्यथा रोटरी पुल बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज महापौरांनी पाहणी  केली. सुरक्षिततेच्या उपायोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राहिलेली कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशी मागणी मी महापौर उषा ढोरे यांच्याकडे केली आहे, असेदेखील चिखले म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.