Nigdi News : जीवनदान देणारे डॉक्टर ईश्वराचे रुप – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश

एमपीसी न्यूज – रात्रंदिन रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मेहनत घेणारे डॉक्टर हे ईश्वराचे रूप आहेत. गेल्या सव्वा वर्षात डॉक्टरांनी लाखो रुग्णांना जीवनदान दिले आहे, तर भयमुक्त समाजासाठी पोलिसांनीही अभयदान दिले आहे. कोरोना काळात काही डॉक्टर आणि पोलीस यांनाही आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले. मात्र, डॉक्टर आणि पोलीस समाजाचे रक्षक बनून अहोरात्र सेवा बजावत आहेत, असे मत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.

राउंड टेबल इंडियाच्या अंतर्गत ‘पुणे अर्बन राउंड टेबल चॅप्टर 289’ संस्थेच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’निमित्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. निगडी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचालित आयुर्वेद रुग्णालय अँड स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील व संबंधित 125 डॉक्टरांचा सन्मान यावेळी करण्यात आला. डॉक्टर्स डे निमित्त केक कापून डॉक्टर, नर्स व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

आयुर्वेद रुग्णालय आणि स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या या सन्मान सोहळ्याला पिंपरी चिंचवड महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, रुग्णालयाच्या प्राचार्या डॉ. रागिणी पाटील, डॉ. अनिरुद्ध टोणगावकर, डॉ. विकास मंडलेचा, ‘राउंड टेबल इंडिया एरिया-15’चे चेअरमन कीर्ती रुईया, ‘पुणे अर्बन राउंड टेबल चॅप्टर 289’चे चेअरमन अंशुल मंगल, अक्षत रुईया आदी उपस्थित होते.

कीर्ती रुईया म्हणाले, कोरोना काळातील डॉक्टरांचे काम अतुलनीय आहे. अहोरात्र रुग्णांवर उपचार करणाऱ्या या डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, या भावनेतून आजच्या दिवशी हा सोहळा आयोजिला आहे. डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांनी बजावलेले कर्तव्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. डॉ. वर्षा डांगे, डॉ. रागिणी पाटील यांनीही मनोगते व्यक्त केली. डॉ. राकेश नेवे, नवीन गोयल यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.