Nigdi News: तरतुदीचे वर्गीकरण करुन दवाखाना इमारतीचे काम तात्काळ हाती घ्यावे – अमित गावडे

0

एमपीसी न्यूज – निगडी, प्राधिकरणातील महापालिका दवाखान्याची इमारत अपुरी पडत आहे. सध्याची इमारतही जुनी झाली असून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काचघर चौकाजवळ आरक्षित असलेल्या भूखंडावर दवाखान्यासाठी सुसज्ज इमारत बांधण्यात यावी. तरतुदीअभावी दवाखान्याचे काम रखडवू नये. तरतुदीचे वर्गीकरण करुन इमारतीचे काम तात्काळ हाती घ्यावे, अशी आग्रही मागणी शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेवक गावडे यांनी म्हटले आहे की, निगडी, प्राधिकरणातील सेक्टर नंबर 25 एलआयजी कॉलनी येथे महापालिकेचा दवाखाना आहे. सुमारे 30 वर्षांपासून तिथे हा दवाखाना आहे. दवाखान्यात उपचारासाठी येणा-या नागरिकांची संख्या जास्त आहे. ही दवाखाना इमारत अपुरी पडत आहे. इमारतही जुनी झाली आहे. त्यामुळे भंडाऱ्यासारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सेक्टर 24 येथील लाल बहादुर शास्त्री चौकाजवळ (काचघर चौक) येथे दवाखान्यासाठी आरक्षित मोकळा भूखंड आहे. या जागेवर दवाखान्यासाठी सुसज्ज इमारत बांधण्याची मागणी मी दोन वर्षांपासून करत आहे. दवाखान्याच्या इमारत कामाचा सन 2020-21 च्या अंदाजपत्रकामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. परंतु, लेखाशीर्षावर पुरेशी तरतूद उपलब्ध नसल्याने काम हाती घेतले जात नाही, हे अत्यंत चुकीचे आहे.

प्राधिकरणात सुसज्ज दवाखान्याची अतिशय आवश्यकता आहे. त्यासाठी महापालिकेने तातडीने तरतुदीचे वर्गीकरण करुन दवाखाना इमारतीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नगरसेवक गावडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.