Nigdi News: दोन सराईत चोरट्यांना अटक; जबरदस्तीने हिसकावलेल्या सोनसाखळीसह दोन दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनने दोन सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून जबरदस्तीने चोरलेली एक सोनसाखळी आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

विजय भाउसाहेब गायकयाड (वय 38, रा. आळेफाटा शिक्षक कॉलनी जवळ, ता. जुन्नर, जि.पुणे), संदिप सुखदेव शिंदे (वय 27, रा. भोजदरी, ता. संगमनेर जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

रविवारी गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस दिघी परिसरात गस्त घालत होते. देहूफाटा ते मोशी रोडवर एका दुचाकीवरून दोघेजण संशयितरित्या जाताना दिसल्याने पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीवरील दोघेही न थांबता पळून जाऊ लागले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणि वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई आप्पासाहेब जायभाय यांनी त्यांचा पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी दोघांकडे पळून जाण्याबाबत विचारले असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे आढळले. पोलिसांनी दोघांकडे चौकशी करत त्यांच्याकडून 75 हजारांची एक सोनसाखळी आणि दोन दुचाकी असा एकूण एक लाख 70 हजारांचा ऐवज जप्त केला.

या कारवाईमुळे निगडी पोलीस ठाण्यातील एक जबरी चोरीचा, देहूरोड आणि घारगाव पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक वाहन चोरीचे असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींवर खेड आणि संगमनेर पोलीस ठाण्यात वाहनचोर आणि जबरी चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत. दोघांना पुढील कारवाईसाठी निगडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे, पोलीस उप निरीक्षक गिरीष चामले, पोलीस कर्मचारी हजरत पठाण, यदु् आढारी, नाथा केकाण, सचिन मोरे, विठठल सानप, गंगाधर चव्हाण, योगेश्वर कोळेकर, महेश भालचिम, राजकुमार हनुमंते, सागर जैन, त्रिनयन बाळसराफ, प्रविण पाटील, राहुल सुर्यवंशी व प्रमोद ढाकणे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.