Nigdi News: निगडीतील दोन्ही उड्डाणपूलादरम्यान होणार भुयारी मार्ग; आयुक्तांचा हिरवा कंदील

एमपीसी न्यूज – निगडीतील भक्ती शक्ती ते मधुकर पवळे उड्डाणपूल या दोन उड्डाणपूलांतर्गत पर्यायी भुयारी मार्ग उभारण्याची मागणी खंडोबा व्यापारी संघटनेने स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली होती. त्या मागणीला यश आले असून, या भुयारी मार्ग उभारण्याच्या प्रकल्पाला आयुक्तांनी मिटींग मध्ये हिरवा कंदील दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रोहिदास शिवणेकर यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना संघटनेचे अध्यक्ष शिवणेकर म्हणाले, पालिकेने उभारलेल्या उड्डाणपूलामुळे अलीकडे-पलीकडे जाण्याचा स्थानिकांचा रस्ता बंद झाला होता. निगडी गावठाणातील नागरिकांना रस्ता ओलांडून जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती.

शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला वर्ग यांची मोठी कुचंबना होत होती. अलीकडे शाळा तर, पलीकडे बँका, बाजारपेठा असल्यामुळे नागरिकांना मोठा वळसा मारून त्या ठिकाणी जावे लागत होते.

उपाययोजना करण्याऐवजी अधिकारी केवळ टोलवाटोलवी करीत होते. मात्र, स्थानिक नगरसेवकांनी यात लक्ष घालताच स्वतः आयुक्त घटनास्थळी येऊन परिसराची पाहणी करून गेले. स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने आयुक्तांसमवेत चर्चा-बैठका पार पडल्या.

मात्र निर्णयाचे घोडे कोठे अडले होते?. आचारसंहिता लागण्यापूर्वी अतितातडीने भुयारी मार्ग उभारण्याबाबत निर्णय घ्यावा. अन्यथा मुंबई-पुणे महामार्ग भक्ती शक्ती उड्डाणपूल ते मधुकर पवळे उड्डाणपूल रस्त्यामध्ये तिरडी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.

स्थानिक नगरसेवक सचिन चिखले यांनी पुढाकार घेत, नगरसेविका सुमन पवळे, नगरसेविका शैलजा मोरे, कोमल घोलप, नगरसेवक अमित गावडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, राजेंद्र बाबर, राजेंद्र काळभोर, खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष तानाजी काळभोर, सचिन काळभोर आदींची मोट बांधून जनरेटा वाढविला.

अखेरीस आयुक्तांनी नमते घेत, भक्ती शक्ती ते मधुकर पवळे या दोन उड्डाणपूलांतर्गत पर्यायी भुयारी मार्ग उभारण्यास सहमती दर्शविली असून, त्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे लवकरच या ठिकाणी भुयारी मार्गाची उभारणी होणार आहे.

”पुणे – मुंबई जुन्या महामार्गावरील निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाणपूल नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा उड्डाणपूल दीड किलोमीटर अंतराचा असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता येत नाही. नागरिक शॉर्टकट म्हणून धोकादायकपणे रस्ता ओलांडत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.

निगडी गावठाणमध्ये रस्त्याच्या बाजूला मोठी बाजारपेठ व दोन ते तीन मोठ्या शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे व पालकांची मोठा प्रमाणात येथे ये-जा होत असते. आयुक्तांनी भुयारी मार्ग उभारण्याच्या प्रकल्पाला सहमती देऊन नागरिकांची जीवघेण्या संकटातून मुक्तता केली आहे, असल्याचे मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.