Nigdi News: प्राधिकरणात लसीकरण केंद्र सुरु; ज्येष्ठ नागरिकांसाठी झाले सुकर

शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी, प्राधिकरणात कोरोना लसीकरण केंद्र कार्यान्वित केले आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची लसीकरणासाठी जवळच सोय झाली आहे. या केंद्रात जेष्ठांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन नगरसेवक गावडे यांनी केली.

निगडीतील श्री छत्रपती शिवाजी जलतरण तलाव सेक्टर 26 येथे कोरोना लसीकरण केंद्र आजपासून सुरु झाले. निगडी, प्राधिकरणात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. प्राधिकरणात लसीकरणाची सोय नव्हती. त्यामुळे नागरिकांना रुपीनगरला किंवा मोहननगरला जावे लागते.

त्यासाठी प्राधिकरणात लसीकरण केंद्र सुरु करण्याची आग्रही मागणी शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांनी महापालिकेकडे केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत महापालिका प्रशासनाने लसीकरण केंद्र सुरु केले आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठी सोय झाली आहे. आता लसीकरणासाठी नागरिकांना लांब जावे लागत नाही.

नगरसेवक अमित गावडे म्हणाले, ”महापालिकेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी जलतरण तलाव सेक्टर 26 येथे कोरोना लसीकरण केंद्र सुरु केले आहे. यामुळे प्राधिकरणातील ज्येष्ठांना लस घेणे सुकर होईल. ज्येष्ठ नागरिकांनी नावनोंदणी करावी. लसीकरण करुन घ्यावे. कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.