Nigdi News : बेकायदा वृक्ष तोड केल्यास कायदेशीर कारवाई करु – मनसेचा उद्यान विभागाला इशारा

एमपीसीन्यूज : वनराईने नटलेल्या निगडी – प्राधिकरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीरपणे वृक्षतोड केली जात आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत बेकायदा वृक्षतोड केल्यास थेट महापालिका उद्यान अधीक्षकावर कायदेशीर कारवाईवर करण्याचा इशारा  दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून निगडी- प्राधिकरण परिसरातील पेठ क्रमांक 25  मध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड केली जात आहे. महापालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालय परिसरात हा वृक्षतोडीचा प्रकार घडत आहे.

जवळपास आठ ते दहा मोठे वृक्ष तोडल्याचे या भागात पहायला मिळत आहे. काही दुकानदारांनी दुकानाच्या फलकांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या कापण्याऐवजी थेट वृक्षच तोडून टाकण्याचे काम केले आहे.

या वृक्षतोडीबाबाबत निगडी- प्राधिकरणातील नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर देखील हा विषय चांगलाच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे शहर उपाध्यक्ष बाळा दानवले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड महापालिका उद्यान अधीक्षक पी.एम.गायकवाड यांची भेट घेत बेकायदा वृक्षतोडीबाबत त्यांना तक्रार केली.

प्राधिकरणातील नागरिकांना किंवा दुकानदारांना वृक्षांच्या फांद्यांचा त्रास होत असले त्या फक्त फांद्या तोडाव्यात. संपूर्ण वृक्ष तोडू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दानवले यांनी उद्यान अधीक्षक गायकवाड यांना दिला. वृक्षतोड सुरूच राहिल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशाराही दानवले यांनी दिला आहे.

दरम्यान, प्राधिकरणातील बेकायदा वृक्षतोडीबाबत आपणास कोणतीही कल्पना नव्हती. याबाबत चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन उद्यान अधीक्षक गायकवाड यांनी दिल्याची माहिती दानवले यांनी दिली.

यावेळी मनसेचे पदाधिकारी ओंकार पाटोळे, दीपेन नाईक, ओंकार तांदळे, जयेश मोरे, ऋषिकेश कांबळे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.