Nigdi News : सततच्या रस्ते खोदाईमुळे यमुनानगर बनले ‘खड्डेनगर’ : सुलभा उबाळे

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक 13 यमुनानगर या प्रभागातील नागरिक गेली दोन वर्षांपासून रस्ते खोदाईमुळे त्रस्त झाले आहेत. दर आठवड्यात कोणता ना कोणता रस्ता, ड्रेनेज, पाणी पुरवठा, केबल टाकण्याच्या नावाखाली खोदला जात आहे. त्यामुळे यमुनानगर आता खड्डे नगर बनले असल्याची तक्रार शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन पाठविले आहे. प्रभाग क्रमांक 13 यमुनानगर या प्रभागातील नागरिक गेली दोन वर्षांपासून रस्ते खोदाईमुळे त्रस्त झाले आहेत. दर आठवड्यात कोणता ना कोणता रस्ता, ड्रेनेज, पाणी पुरवठा, केबल, टाकण्याच्या नावाखाली खोदला जात आहे.

रस्ता खोदून झाला की त्यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून निकृष्ठ दर्जाचे डांबर टाकले जाते. काही दिवसांनी तोच रस्ता पुन्हा इतर कोणत्या तरी कारणासाठी खोदला जातो. यामुळेच यमुनानगरची अवस्था खड्डेनगर झाली आहे. याचा स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

त्यामुळे आता आयुक्तांनीच यमुनानगरमध्ये लक्ष घालून तातडीने रस्ते डांबरीकरण करण्याचे आदेश स्थापत्य विभागाला द्यावेत, अशी मागणी उबाळे यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.