Nigdi News : ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी यमुनानगरमध्ये कोरोनाबाबत जनजागृती

शिवसेना विभागप्रमुख सतीश मरळ यांचा आदर्श उपक्रम

एमपीसीन्यूज : मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलक न लावता कोरोना महामारीबाबत जनजागृती करणारे फलक लावून शिवसेना विभागप्रमुख सतीश मरळ यांनी नवा आदर्श घालून दिला आहे. निगडी-यमुनानगर परिसरातील उद्यानांच्या प्रवेशद्वारावरील ‘मास्क नाही प्रवेश नाही’ या आशयाचे मरळ यांनी लावलेले जनजागृती फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

गेल्या वर्षी आलेल्या कोरोना महामारीने मार्च महिन्यात देशभरात व या वर्षी एप्रिलमध्ये राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. या महामारीने अनेकांचे बळी घेतले. अनेक बालकांचे मातृ-पितृ छत्र हिरावून घेतले. कुणाचे पती, कुणाची बहीण, आजी- आजोबा अशी कुटुंबातील आधार देणारी मायेची माणसे कोरोनामुळे जग सोडून गेली. शहरांसह खेडोपाडी कोरोनाने हाहाकार माजवला.

मात्र, मध्यंतरी कोरोनाचे रुग्ण कमी झाले. त्यामुळे अनेकांनी शासकीय नियम आणि बंधने झुगारून पुन्हा कोरोनाला आमंत्रण मिळेल अशी वर्तवणूक सुरु केली. शेकडो, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले. त्यामुळे कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून देशातील दहा कोरोना हॉटस्पॉटपैकी महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांच्या समावेश आहे.

अशा परिस्थितीतही नागरिकांना वेळोवेळी मास्क, सोशल डिस्टन्सिंग या नियामांबद्दल वारंवार सांगावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना निगडी-यमुनगरचे विभागप्रमुख सतीश मरळ यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा फलक लावण्याऐवजी कोरोनाबाबत जनजागृती करणारे फलक लावण्यास प्राधन्य दिले.

निगडी-यमुनगरमधील प्रत्येक उद्यानासमोर, महापालिका कार्यालये, जलतरण तलाव, मंदिर आदी ठिकाणी ‘मास्क नाही प्रवेश नाही’ या आशयाचे फलक लावत त्यांनी कोरोना महामारीबाबत स्थानिक नागरिकांची जनजागृती केली. मास्क वापरा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, सोशल डिस्टन्सिंग पाळा,  हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवा, डोळे, नाक, तोंडाला वारंवार स्पर्श करू नका, असे जनजागृतीपर संदेश या फलकांवर आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.