Nigdi News : प्राधिकरणातील सेक्टर 26 मधील मोकळ्या भूखंडावरील अतिक्रमणावर कारवाई करा – अमित गावडे

एमपीसी न्यूज – निगडी, प्राधिकरणातील सेक्टर 26 येथील मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. बेकायदेशीपणे टप-या, झोपड्या वसल्या आहेत. तिथे रात्री उशिरापर्यंत गोंधळ असतो. त्याचा सेक्टर 26 परिसरातील नागरिकांना मोठा त्रास होत आहे. या अतिक्रमणावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक अमित गावडे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात नगरसेवक गावडे यांनी म्हटले आहे की, निगडी, प्राधिकरणातील सेक्टर 26 येथून रावेतच्या नवीन पुलाला जाणा-या रस्त्याच्या डाव्या बाजूला मोकळी जागा आहे. मोठा भूखंड आहे. या भूखंडावर बेकायदेशीरपणे टप-या टाकल्या आहेत. झोपड्या झाल्या आहेत.

भक्ती-शक्ती पुलाचे काम करणा-या ठेकेदाराला लेबर कॅम्पसाठीही तिथे जागा दिली होती. आता पुलाचेही काम संपले आहे. टप-या, झोपडपट्यांमुळे तिथे रात्री उशिरापर्यंत गोंधळ असतो. महिन्याभरापूर्वी झालेल्या ‘अ’ प्रभागातील बैठकीदरम्यान आपण स्वत: कारवाईचे आदेश दिले होते. परंतु, कारवाई अद्याप झाली नाही. आपला आदेश कर्मचा-यांनी धुडकावून लावला आहे. या परिसरातील नागरिकांचा सेक्टर 26 मधील लोकांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे या अतिक्रमणावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक गावडे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.