Nigdi : विद्यार्थिनी अपहरण बलात्कार प्रकरण; तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट

एमपीसी न्यूज – एका 21 वर्षीय विद्यार्थिनीचे निगडीतून अपहरण झाले. तिच्यावर तीन जणांनी लैंगिक अत्याचार केला. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात आणि वैद्यकीय अहवालात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे समोर आले आहे.

पीडित तरुणी पिंपरी-चिंचवड शहरात शिक्षण घेण्यासाठी आली होती. तिचे 30 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास टिळक चौक, निगडी येथे रिक्षातून आलेल्या तीन जणांनी तोंडावर गुंगीचा स्प्रे मारून अपहरण केले. त्यानंतर तिला रिक्षातून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भरदिवसा आणि वर्दळीच्या चौकात ही घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने अनेक महिला संघटनांनी याबाबत पोलीस आयुक्‍तालयात जाऊन वरिष्ठांची भेट घेतली. या गुन्ह्यातील आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली. आरोपींची धिंड काढण्यावरून ते कठोरात कठोर शासन होण्यापर्यंतच्या मागण्या वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडे करण्यात आल्या.

तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे तपास करत असताना पोलिसांना टिळक चौकातील सीसीटिव्ही कॅमे-यांमध्ये पिडित तरुणी कोठेही दिसून आली नाही. यामुळे तिच्या पालकांनी स्वतः त्या परिसरात फिरून सीसीटिव्हीच्या कामकाजाबाबत माहिती घेतली. तसेच तरुणीच्या मोबाईलचे लोकेशन निगडीतील होते. मात्र, टिळक चौकातील नव्हते. ज्यावेळी तरुणीवर अत्याचार झाला त्यावेळी तिच्या अंगावर दागिने होते. मात्र आरोपींनी दागिन्यांना हात लावलेला नव्हता. पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत आपल्याला गुंगीचा स्प्रे नव्हे तर चाकूचा धाक दाखविल्याचे म्हटले. यामुळे पोलिसांनी सर्वच बाजूंनी तपास करण्यास सुरवात केली. पोलिसांच्या तपास कार्यात तरुणीचे कुटुंबीयही सहभागी झाले होते. मात्र सर्वच पुरावे विरोधात येत असल्याने ते देखील चक्रावून गेले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी बलात्काराबाबत वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झालाच नसल्याचे म्हटले आहे. मग त्या तरुणीने पोलिसांना चुकीची माहिती का दिली, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. त्या तरुणीने न्यायालयातही आपले म्हणणे सादर केल्याची माहिती मिळत आहे. मात्र पोलिसांनी न्यायालयातील जबाब दिल्याच्या वृत्ताबाबत दुजोरा दिला नाही. मात्र लवकरच या प्रकरणाचा उलगडा करू, असा विश्‍वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.