Nigdi : पार्किंगच्या कारणावरून चावून काढला कानाचा तुकडा

एमपीसी न्यूज – पार्किंगच्या कारणावरून एकाने पती-पत्नीला लोखंडी टॉमीने मारहाण केली. तसेच पतीच्या कानाला चावा घेत त्याच्या कानाचा तुकडा पाडला. ही घटना सोमवारी (दि. 8) रात्री साडेअकराच्या सुमारास यमुनानगर, निगडी येथे घडली.

कौतुभ महेंद्र गोळे (वय 26, रा. यमुनानगर, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अभिजित गुंजाळ (रा. यमुनानगर, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौतुभ यांची दुचाकी सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. त्यांच्या दुचाकीजवळ बसून अभिजित काहीतरी करीत होता. अभिजित दुचाकीला काहीतरी खोडसाळपणा करीत असल्याचे कौतुभ यांची पत्नी सुषमा यांच्या लक्षात आले. त्यांनी कौतुभ यांना याबाबत सांगितले. कौतुभ पार्किंगमध्ये आले असता अभिजितने त्यांच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडले.

दुचाकीला लाथ का मारली याचा जाब विचारला असता अभिजित याने ‘त्याची कार पार्क करण्यासाठी कौतुभ यांच्या दुचाकीमुळे अडचण येत आहे’ असे म्हणत कौतुभ आणि त्यांच्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी टॉमी मारली. तसेच कौतुभ यांच्या उजव्या कानाला जोरात चावा घेतला. यामुळे कौतुभ यांच्या कानाचा तुकडा पडला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.